पनवेल महापालिका क्षेत्रात साप्ताहिक मेळाव्यांचे आयोजन

 ६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य मेळावे

पनवेल : आयुष्यमान भवः कार्यक्रमांतर्गत पनवेल महापालिका क्षेत्रातील सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य मेळावे घेण्यात आले. या आरोग्य मेळाव्यांमध्ये नागरिकांची कुष्ठरोग आणि क्षयरोगाची तपासणी करण्यात आली. यावेळी क्षयरोग संशयित रुग्णांचे थुंकी नमुने घेण्यात आले आणि कुष्ठरोग संशयित रुग्णांना संदर्भित करण्यात आले.

यावेळी सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील १५ वैद्यकिय अधिकारी यांनी निक्षय मित्र बनून ३५ क्षयरोग रुग्णांना निक्षय पोषण आहार दिला. ३० वर्षांवरील व्यक्तींची असंसर्गजन्य रोगाची तपासणी करण्यात आली. याबरोबरच गरोदर मातांचीही तपासणी करण्यात आली. नागरिकांना आयुष्यमान कार्ड बाबत प्रवृत्त करण्यात आले.

प्रत्येक स्तरावरील व्यक्तीला केंद्र शासनाच्या उत्कृष्ट दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी केंद्र शासनाने आयुष्यमान भव अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने साप्ताहिक आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल महापालिकेच्या वतीने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रमांक १ ते ६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येक शनिवारी आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या आरोग्य मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

सदर अभियानांतर्गत ३० डिसेंबर पर्यंत महिन्यातील पहिल्या शनिवारी असंसर्गजन्य आजार यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी आजार, दुसऱ्या शनिवारी संसर्गजन्य यामध्ये क्षयरोग, कुष्ठरोग, एचआयव्ही आदिंची तपासणी, तिसऱ्या शनिवारी माता बाल तपासणीॅ, यामध्ये गरोदर माता, प्रसुती झालेल्या मातांची तपासणी करण्यात येत आहे. चौथ्या शनिवारी नाक, कान, घसा, सिकलसेल, दंतरोग, उपशामक सेवा, नेत्ररोग, त्वचा आजार याबाबतची विशेष सत्रे या आरोग्य मेळाव्यामध्ये घेण्यात येत आहे. या आरोग्य मेळाव्यामध्येच उपचार, संदर्भ सेवा याचबरोबर नागरिकांना आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड नोंदणी-वितरण याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच अवयव दान शपथ, नोंदणी, रक्तदान चळवळ विषयीची माहितीही यावेळी देण्यात येत आहे.

नागरिकांनी सदर सुविधेचा लाभ घेण्याकरिता उत्स्फुर्तपणे त्यांना माहिती द्यावी, असे आवाहन मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ऐरोली-मुलुंड उड्डाणपुलावरील वाहतुकीत बदल