माझी माती माझा देश उपक्रम
‘एनएसडी'च्या अमृत कलशात नवी मुंबईतील मातीचे संकलन
नवी मुंबई : ‘भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव'च्या समारोपीय पर्वानिमित्त ‘माझी माती माझा देश' अर्थात मेरी माटी मेरा देश उपक्रम देशभरात अतिशय उत्साहात राबविला जात असून नवी मुंबई महापालिका आपल्या स्तरावर विविध विभागांत लोकसहभागातून विविध उपक्रम राबवित आहे. नवी मुंबईकर नागरिकही यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत देशभक्तीचे दर्शन घडवित आहेत. तसेच शहीद वीरांविषयी मनात असलेला आदर आणि अभिमान अभिव्यक्त करीत आहेत.
या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात ‘अमृत कलश यात्रा' असा अभिनव उपक्रम राबविला जात असून यामध्ये नवी मुंबईच्या घराघरातून माती संकलित केली जात आहे. विभागांमध्ये निघणाऱ्या या ‘अमृत कलश यात्रा'नाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांमार्फतही माझी माती, माझा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रा काढून विविध ठिकाणची माती संकलित केली जात आहे.
अशाच प्रकारे नॅशनल सिक्युरिटी गार्ड मुंबई यांच्या वतीने मुंबई महानगर प्रदेशातील विविध महारपालिका कार्यालयांना भेटी देत त्याठिकाणची माती अमृत कलशात संकलित केली जात आहे.
या अनुषंगाने नुकतीच नॅशनल सिक्युरिटी गार्ड संस्थेच्या वतीने मेजर इंद्रजीत बर्वे आणि जसविंदर सिंग यांनी २६ सहकाऱ्यांच्या समुहासह नवी मुंबई महापालिका मुख्यालयास भेट देत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते मुख्यालय आवारातील माती त्यांच्या अमृत कलशात संकलित करुन घेतली. याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, ‘माझी माती माझी देश अभियान'च्या नमुंमपा नोडल अधिकारी तथा उपायुक्त मंगला माळवे, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता सुनिल लाड तसेच यात्रा समन्वयक ‘स्माईल्स फाऊंडेशन संस्था'चे पदाधिकारी उमा आहुजा, धिरज आहुजा आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीनेही अशाच प्रकारच्या ‘अमृत कलश यात्रां'चे विभागवार आयोजन केले जात असून विभागाविभागांतून संकलित केलेले मातीचे अमृत कलश महापालिका मुख्यालयात आणले जाणार आहेत. संपूर्ण नवी मुंबई महापालिका क्षेत्रासाठीच्या मोठ्या अमृत कलशात एकत्रित केली जाणार आहे.