पनवेल मध्ये १४८ ठिकाणी स्वच्छता मोहीम संपन्न

माेहिमेमध्ये माजी नगरसेवक, विद्यार्थी, बचतगट, विविध सामाजिक संस्था, नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग

पनवेल : केंद्र शासनाच्या सूचनेनुसार पनवेल महापालिकेच्या वतीने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून १ ऑक्टोबर रोजी महापालिका कार्यक्षेत्रात ‘एक तारीख-एक तास, स्वच्छतेसाठी श्रमदान' स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. शहराच्या स्वच्छतेत नागरिकांचा सहभाग वाढवा या उद्देशाने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागांतर्गत उद्याने, स्मशानभूमी, तलाव, हायवे, बाजारपेठा, बसस्टॉप, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, रुग्णालये अशा १४८ ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. आयुक्त गणेश देशमुख यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पनवेल महापालिका हद्दीतील ३६ हॉस्पिटल्स, ४६ शाळा-महाविद्यालये, २० स्वयंसेवी संस्था, बचत गट आणि रहिवाशी संस्थांनी पनवेल महापालिकेसोबत स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

यामध्ये पनवेल शहर प्रभाग-ड मध्ये कृष्णाळे तलाव परिसराची स्वच्छता करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, नगरपरिषद प्रशासनाचे आयुक्त तथा संचालक मनोज रानडे, आयुक्त गणेश देशमुख, महापालिकेचे माजी आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त सचिन पवार, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, माजी नगरसेवक, स्वच्छता विभाग प्रमुख अनिल कोकरे, ‘लायन्स क्लब सरगम'चे सदस्य, ‘इनरव्हिल क्लब'च्या महिला सदस्य, बांझ महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयुक्त देशमुख यांनी नागरिकांनी आजपासून स्वच्छता मोहिम स्वतःपासून राबविण्यास सुरुवात करण्याचे आवाहन केले.

याबरोबरच महापालिका कार्यक्षेत्रात सर्व शाळा महाविद्यालयांच्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त भारत राठोड आणि किर्ती महाजन, सर्व शासकीय, खाजगी रुग्णालय, दवाखान्याच्या ठिकाणी मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सर्व बचत गट आणि स्वयंसेवी संघटना यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेस उपायुक्त डॉ. वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त संग्राम व्होरकाटे, प्रभाग समिती-अ खारघर येथे उपायुक्त गणेश शेटे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, प्रभाग समिती-ब, कळंबोली उपायुक्त कैलास गावडे, प्रभाग समिती-क, कामोठे याठिकाणी शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सर्व प्रभाग अधिकारी, सर्व स्वच्छता निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली १४८ ठिकाणी स्वच्छता मोहिम चांगल्या पध्दतीने राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेदरम्यान सुमारे ३७ टन कचरा गोळा करण्यात आला.

या मोहिमेसाठी घमेले, झाडू, कचरा गोळा करण्याच्या पिशव्या, मास्क, हातमोजे, गवत कापण्याची यंत्रे, वाहने अशी सर्व जय्यत तयारी महापालिकेने केली होती. सदर मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिकेच्या वतीने नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यांच्या नियंत्रणाखाली सदर स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ज्येष्ठ नागरिकांच्या कला-क्रीडा गुणांच्या कौतुकाने सजला ज्येष्ठ नागरिक दिन