स्वच्छता ही सेवा उपक्रम!

स्वच्छता मोहिमेतून नवी मुंबईच्या एकतेचे दर्शन - पद्मश्री शंकर महादेवन

नवी मुंबई : ‘निश्चय केला, नंबर पहिला' अशी स्वच्छता जिंगल गात ‘स्वच्छ नवी मुंबई मिशन'चे ब्रँड अँबेसेडर, सुप्रसिध्द संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन यांनी उपस्थितांचा उत्साह वाढवित ‘स्वच्छता ही सेवा' उपक्रमांतर्गत वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो ज्येष्ठ नागरिकांसमवेत आयोजित केलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. याप्रसंगी पद्मश्री शंकर महादेवन यांच्या समवेत आमदार गणेश नाईक, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ, महाराष्ट्र शासनाच्या ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान'चे राज्य संचालक नवनाथ वाठ, उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, माजी नगरसेवक संपत शेवाळे, सौ. नेत्रा शिर्के यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसह एकूण ७७५ हून अधिक नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला, त्याचप्रमाणे सेक्टर-९ वाशी येथील मिनी सी शोअर जुहूगांव चौपाटी परिसरात २५५ तृतीयपंथी नागरिकांनी स्वच्छता मोहीम राबवली. नवी मुंबईतील शाळा, महाविद्यालये, उद्याने, स्टेशन, डेपो, मार्केट, आरोग्य केंद्रे, नाला परिसर, पडीक जागा अशा महापालिकेने निश्चित केलेल्या २६७ ठिकाणी तसेच इतर शासकीय आणि खाजगी कार्यालये, सोसायट्या, संस्था यांच्या वतीने करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमांमध्ये १ लाख २८ हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग घ्ोत स्वच्छतेविषयी जागरुकतेचे आणि नवी मुंबईच्या एकात्मभावाचे दर्शन घडविले.  
याशिवाय आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी बेलापूर येथील किल्ले गांवठाण परिसरात आणि आमदार रमेश पाटील यांनी घणसोली हायस्वुÀल येथे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. टीएस चाणक्य सागरी प्रशिक्षण संस्थेच्या परिसरातील सागरी किनाऱ्याशेजारील खारफुटी परिसरात आयकर विभागाच्या वतीने आयोजित स्वच्छता मोहिमेत मुख्य आयकर आयुक्त संजय कुमार यांच्या समवेत अभिनेते राजकुमार राव आणि सुनील ग्रोव्हर तसेच आयकर विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी उत्साही सहभाग घेतला.

 
मोहिमेतून नवी मुंबईच्या एकतेचे दर्शन - पद्मश्री शंकर महादेवन
नवी मुंबई हे आपले शहर स्वच्छतेमध्ये देशात नेहमीच आघाडीवर राहिले असून अपेक्षेनुसार शहरात मोठ्या संख्येने वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये लाखो नवी मुंबईकर नागरिक रस्त्यावर उतरुन स्वच्छतेसाठी श्रमदान करताहेत यातून आपल्या शहराच्या एकीची शक्ती दिसून येते, असे मत व्यक्त करीत या स्वच्छतेच्या सवयीचा प्रत्येक नागरिकाने कायमस्वरुपी अंगिकार करावा, असे आवाहन पद्मश्री शंकर महादेवन यांनी केले.


मुख्यमंत्र्यांना अपेक्षित लोकचळवळ साकारली -आयुवत राजेश नार्वेकर
केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन'च्या वतीने देशातील निवडक ठिकाणांवर केंद्रीय पथकाने येऊन छायाचित्रीकरण केले. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील मुंबई आणि नवी मुंबई या दोनच शहरांचा समावेश होता. सदर बाब आपल्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची असल्याचे मत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरंेद्र मोदी यांच्या आवाहनानुसार स्वच्छतेसाठी श्रमदानासाठी संपूर्ण नवी मुंबई शहरात सव्वा लाखाहून अधिक न्नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने ठिकठिकाणी सहभागी होत नेहमीप्रमाणेच विक्रमी प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या सदर कार्यक्रम लोकचळवळ व्हावा या संकल्पनेला सार्थ ठरविले, याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार मानले.

 
स्वच्छता मोहीम यशस्वीतेचे सूक्ष्म नियोजन...
शाळा, महाविद्यालये, उद्याने, स्टेशन, डेपो, मार्केट, आरोग्य केंद्रे, नाला परिसर, पडीक जागा अशा तब्बल २६७ ठिकाणी संपन्न झालेल्या सदर स्वच्छता मोहिमेचे आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाने सूक्ष्म नियोजन केले होते. याकरिता प्रत्येक स्वच्छता स्थळासाठी एका समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या सूचनांनुसार समन्वयकाने स्वच्छता मोहीम राबवित असलेल्या स्थळावर सफाई करण्यापूर्वीच्या स्थितीची छायाचित्रे, सफाई करतानाची छायाचित्रे तसेच सफाई झाल्यानंतरची छायाचित्रे आणि व्हिडिओ लघुचित्रफिती काढली. या समन्वयकांनी जिओ टॅगींगसह काढलेली छायाचित्रे केंद्रीय वेबपेजवर अपलोड करण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्रीने सुसज्ज तात्काळ कृती कक्ष स्थापन केला होता. इतर शहरांच्या तुलनेत स्वच्छता मोहीमेची ठिकाणे नवी मुंबईत खूप जास्त असल्याने तसेच केंद्रीय वेबपेजवर छायाचित्रे आणि व्हिडिओसह माहिती अपलोड करण्याची निर्धारित वेळ असल्याने याविषयी पूर्ण खबरदारी घेत पूर्वनियोजन करण्यात आले होते.


केंद्रीय पथकाकडून विशेष दखल...
नवी मुंबईकर नागरिकांचा प्रचंड उत्साह संपूर्ण नवी मुंबईत रस्तोरस्ती दिसून आला. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आबालवृध्द उत्स्फुर्तपणे शहर स्वच्छतेचा ध्यास घेऊन या उपक्रमात सहभागी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. अनेक नागरिकांनी आपापल्या क्षेत्रात गटागटाने जमून स्वच्छता मोहिमा राबविल्या. यामध्ये मुली, युवती आणि महिलांची संख्याही लक्षणीय होती. विशेष म्हणजे मिनी सी शोअर वाशी येथे २०० हून अधिक तृतीयपंथी नागरिकांनी खाडीकिनारी स्वच्छता मोहीम राबवित सक्रिय सहभाग घेतला, ज्याची विशेष नोंद केंद्रीय पथकामार्फत घेण्यात आली.

संपूर्ण नवी मुंबई शहरातील नागरिकांना स्वच्छतेच्या धाग्याने जोडणारा सदर उपक्रम महापालिकेने निश्चित केलेल्या २६७ जागा त्यासोबतच इतर संस्था, सोसायट्या, कार्यालये, स्थानिक नागरिक गट अशा साधारणतः ३०० हून अधिक ठिकाणी १ लाख २८ हजारहून अधिक नागरिकांनी एकजुटीने एकत्र येत १ तास श्रमदान करुन यशस्वी केला. हीच स्वच्छतेची सवय आम्ही कायम राखू आणि निश्चय केला, नंबर पहिला असे ध्येयवाक्य साध्य करण्यासाठी आचरणात आणू, अशी प्रतिज्ञाच जणू नवी मुंबईकर नागरिकांनी श्रमदान करीत स्वकृतीतून दाखवून दिली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे महापालिकेचा ४१ वा वर्धापन दिन साजरा