हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लॉक

बेलापूर आणि पनवेल या स्थानकादरम्यान लोकल सेवा राहणार बंद

मुंबई : ‘मध्य रेल्वे'च्या वतीने हार्बर मार्गावर आज ३० सप्टेंबर पासून ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.  डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या २ नवीन अप आणि डाऊन लाईन्सच्या बांधकामासह पनवेल उपनगरीय रीमॉडेलिंग कामासाठी बेलापूर आणि पनवेल या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ३० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते २  ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत ३८ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे ३० सप्टेंबर रोजी पनवेल साठी ‘सीएसएमटी'वरुन शेवटची लोकल रात्री ९.०२ वाजता सुटणार आहे.

ब्लॉक कालावधीत हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील बेलापूर आणि पनवेल स्थानकादरम्यान उपनगरीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय लोकल बेलापूर, नेरुळ आणि वाशी रेल्वे स्थानकापर्यंत शॉर्ट टर्मिनेट किंवा ओरीजनेट चालविण्यात येणार आहेत. ट्रान्स-हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय लोकल सेवा ठाणे आणि नेरुळ, वाशी स्थानकांदरम्यानच धावणार आहे.

ब्लॉक सुरु होण्यापूर्वी डाऊन हार्बर मार्गावरील पनवेल साठी शेवटची लोकल ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ३० सप्टेंबर रोजी रात्री ९.०२ वाजता सुटेल आणि ती रात्री १०.२२ वाजता पनवेल येथे पोहोचेल. तर पनवेल येथून अप हार्बर मार्गावर सुटणारी शेवटची लोकल ३० सप्टेंबर रोजी रात्री १०.३५ वाजता पनवेलहून सुटून रात्री ११.५४ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. ट्रान्स-हार्बर मार्गावर पनवेल साठी शेवटची लोकल ३० सप्टेंबर रोजी ठाणे येथून रात्री ९.३६ वाजता सुटून १०.२८ वाजता पनवेल येथे पोहोचेल. तर ट्रान्स-हार्बर मार्गावर पनवेलहून सुटणारी शेवटची अप लोकल ९.२० वाजता सुटून ठाण्याला रात्री १०.१२ वाजता पोहोचेल.

पनवेल साठी सीएसएमटी येथून ब्लॉकनंतर पहिली लोकल ट्रेन २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.०८ वाजता सुटेल आणि दुपारी १.२९ वाजता पनवेल येथे पोहोचेल. तर पनवेल येथून सीएसएमटीच्या दिशेने पहिली लोकल ट्रेन पनवेल येथून दुपारी १.३७ वाजता सुटेल. तर ब्लॉकनंतर ठाणे ते पनवेल दरम्यान पहिली लोकल ट्रेन २ ऑवटोबर रोजी दुपारी १.२४ वाजता ठाणे येथून सुटून ती दुपारी २.१६ वाजता पनवेल येथे पोहोचेल. पनवेल येथून ठाणेच्या दिशेने पहिली लोकल २ ऑवटोबरला पनवेल स्थानकातून दुपारी २.०१ वाजता सुटून ठाणे स्थानकात २.५४ वाजता पोहोचेल. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेलजवळ मालगाडीचे डब्बे घसरले