अंमली पदार्थांच्या सेवनात अडकली ‘उरण'ची तरुणाई

उरण, जेएनपीए बंदर परिसरात अंमली पदार्थांची तस्करी?

उरण : नवी मुंबई पोलीस यंत्रणेच्या दुर्लक्षितपणामुळे सध्या मोठ्या प्रमाणात उरण, जेएनपीए बंदर परिसरात अंमली पदार्थांची तस्करी होत आहे. अशा तस्करीच्या माध्यमातून विक्री केल्या जाणाऱ्या अंमली पदार्थांच्या सेवनात उरणची तरुणाई मोठ्या प्रमाणात अडकत चालली असल्याची भिती नातेवाईक मंडळींकडून वर्तवली जात आहे. त्यातच नुकतीच उरण नागांव येथील अक्षय वाघमारे या तरुणाला मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई शहरातील अंमली पदार्थांसंदर्भात पाळेमुळे शोधून काढण्यासाठी सीबीआय तसेच राज्यातील पोलीस यंत्रणेने पुढाकार घेतला आहे. मात्र, मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या नवी मुंबई मधील उरण, जेएनपीए बंदर परिसरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री करण्यात येत आहे. अशा अंमली पदार्थांच्या सेवनात उरणची तरुणाई मोठ्या प्रमाणात अडकत चालली असल्याची भिती खुद्द अंमली पदार्थांच्या सेवनात अडकलेल्या तरुणाईच्या नातेवाईक, मित्र-मंडळींकडून ऐकण्यास मिळत आहे.

दरम्यान, ४-५ वर्षांपूर्वी उरण तालुक्यातील एका माजी सरपंचाला अंमली पदार्थांच्या विक्री, बाळगल्याप्रकरणी गुजरात राज्यातील पोलीस यंत्रणेने ताब्यात घेऊन कारवाईचा बडगा उगारल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर ‘उरण सामाजिक संघटना'च्या पदाधिकाऱ्यांनी उरण तालुक्यातील एका विद्यालयातील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या नशेच्या आहारातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. तसेच अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायजेरियन नागरिकांना रुम मालकांनी रुम भाड्याने देऊ नये अशा प्रकारचे बॅनर्स ‘मनसे'च्या वतीने उरण शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले होते. मात्र, या गंभीर बाबींकडे पोलीसांनी दुर्लक्ष केल्याने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नागरिकांनी उरण, द्रोणागिरी नोड, जेएनपीए बंदरात राजरोसपणे आपला गोरखधंदा सुरू केला आहे. परिणामी, उरणची तरुणाई मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या सेवनात अडकत चालली असल्याची भिती तरुणाईच्या नातेवाईक मंडर्ळींकडून वर्तवली जात असताना नुकतेच मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी नागांव-पिरवाडी येथील अक्षय वाघमारे या तरुणाला ताब्यात घेतल्याने उरण मध्ये एकच खळबळ उडाली आहे.

एकंदरीत उरणच्या तरुणाईला अंमली पदार्थांच्या महाराक्षसी जोरखंडातून कोण वाचविणार? असा प्रश्न व्यसनात अडकलेल्या तरुणाईचे नातेवाईक, मित्र परिवार विचारत आहेत. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लॉक