ठाणे परिसरात ६४३५ श्रीगणेशमुर्तींचे भावपूर्ण विसर्जन

निरनिराळ्या स्वीकृती केंद्रांत भाविकांनी दिल्या ४९० मूर्ती

ठाणे ः अनंत चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण ६४३५ गणेशमुर्तींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. त्यात ७४६ सार्वजनिक मंडळाच्या गणेशमुर्तीही होत्या. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये ३७१७ तर विशेष टाकी व्यवस्थेत ३३९ गणेश मूर्तींचे भाविकांनी विसर्जन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात मासुंदा तलाव खारीगाव आणि ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील विसर्जन घाटांना भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली.

विसर्जन सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांना विविध सेवा पुरवणाऱ्या सामाजिक संस्थेच्या मंडपांना भेटी देऊन त्यांच्या कार्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक केले. तसेच गणेशभक्तांशी संवाद साधला. याप्रसंगी माजी महापौर नरेश म्हस्के आणि अशोक वैती, तसेच, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त शंकर पाटोळे, आदि उपस्थित होते.

दरम्यान, महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले आहेत. प्रत्यक्ष विसर्जनाच्या ठिकाणी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी पाहणी केली.

४९० मूर्ती स्वीकार केंद्रात दान...
महापालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या गणेशमूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण ४९० गणेशमुर्तींचे महापालिकेच्या वतीने विधिवत विसर्जन करण्यात आले.
 

३५ टनाहून अधिक निर्माल्य जमा...
 ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ गेली १२ वर्षे गणेशोत्सव काळातील निर्माल्यावर व्यवस्थापन करीत आहे. त्यात रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी तसेच प्रकल्प पुनर्निर्माणचे सदस्य मदत करतात. पाच दिवसाच्या गणेश मूर्ती आणि गौरी मूर्ती विसर्जनावेळी सुमारे १० टनाहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करुन त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनावेळी सुमारे १० टन, तर पाचव्या दिवशी १५ टन निर्माल्य संकलन झाले होते. एकूण सुमारे ३५ टन निर्माल्य संकलित झाले.

विर्सजन आकडेवारीः
(विर्सजन स्थळ (संख्या)-गणेश मूर्तींची संख्या)
कृत्रिम तलाव (१५) - ३७१७
विसर्जन घाट (०७) - २३७९
विशेष टाकी व्यवस्था (४२) - ३३९
एकूण - ६४३५

एकूण गणेश मूर्ती - ६४३५
सार्वजनिक गणेश मूर्ती - ७४६
मूर्ती स्वीकार केंद्र - ४९०. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गणेशोत्सवच्या आडून फुकटात जाहिरातबाजी