ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रत्येक वॉर्डमध्ये रविवारी सकाळी १० वाजता ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचे आयोजन

स्वच्छता ही सेवा’ अभियानात सर्व ठाणेकरांनी रविवारी एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करावे

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे आवाहन

          ठाणे : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ‘स्वच्छता ही सेवा’ हे अनोखे अभियान जाहीर केले आहे. हे अभियान राज्यात मोठ्या उत्साहाने साजरे करण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्यानुसार, रविवार, ०१ ऑक्टोबर रोजी ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रत्येक वॉर्डमध्ये सकाळी १० वाजता स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करण्यात येणार आहे. या अभियानात सर्व ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.

         पाच सूत्रे महत्त्वाची
           स्वच्छतेसाठी जे जे करता येईल ते करावे आणि स्वच्छतेसाठी मारक ठरेल ते करू नये हे मध्यवर्ती सूत्र सगळ्यांनी लक्षात ठेवावे, असे आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, उपक्रम समन्वयक यांनी स्वच्छतेसाठी जागा निश्चित करावी. नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या सहभागाची संख्या लक्षात घ्यावी. लोकप्रतिनिधी, सेवाभावी आणि स्वयंसेवी संस्था यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. या उपक्रमामुळे आपण निवडलेल्या जागेत दृश्य स्वरूपात फरक जाणवला पाहिजे अशी पाच सूत्रे आयुक्त श्री. बांगर यांनी आखून दिली.

         सफाई कर्मचाऱ्याने जसे काम करावे अशी आपल्याला अपेक्षा असते तसे काम आपण सगळ्यांनी रविवारी प्रत्यक्ष करूया. श्रमदान मोहीम राबविताना सगळे एकसमान असतील. त्यात कोणी वरिष्ठ किंवा कनिष्ठ असा भेद नसेल. त्याची जाणीव ठेवून सगळे काम करतील, अशी अपेक्षाही आयुक्त श्री. बांगर यांनी व्यक्त केली.

     महात्मा गांधी यांना 'स्वच्छांजली' अर्पण करणे
      नऊ वर्षांपूर्वी, २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेच्या जागृकतेविषयी नारा दिला होता. त्याला प्रतिसाद देत समाजातल्या सर्व स्तरातील नागरिकांनी स्वच्छ भारत मोहिमेबाबत प्रचंड उत्साह दाखवला होता. परिणामी, स्वच्छता हे राष्ट्रीय आचरण बनले आणि स्वच्छ भारत अभियान हे नाव घराघरात पोचले. यंदा गांधी जयंतीनिमित्त ०१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता स्वच्छतेसाठी ०१ तास श्रमदान करण्याचे आवाहन मा. पंतप्रधान यांनी केले आहे. गांधीजींच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला देशातील सर्व नागरिक एकत्रितपणे त्यांना 'स्वच्छांजली' अर्पण करतील. नागरिकांनी वेळात वेळ काढून स्वच्छतेच्या या मोहिमेत सहभागी होऊन मदत करावी. तुम्ही या स्वच्छता मोहिमेत तुमच्या गल्लीत किंवा परिसरात किंवा उद्यान, नदी, तलाव किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी देखील सहभागी होऊ शकता, असे श्री. मोदी यांनी म्हटले आहे.

         सगळ्यांचा सहभाग
         त्यानुसार, या महास्वच्छता मोहिमेद्वारे सर्व स्तरातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणे, उदाहरणार्थ, बाजारपेठ, रेल्वे मार्ग, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी स्वच्छतेच्या प्रत्यक्ष उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यात, शासनाच्या सर्व विभागांसोबत, सामाजिक संस्था, रहिवासी कल्याण संघटना, खाजगी उपक्रम, स्वच्छता कार्यक्रमात सहभागी होतील.

          तयारीचा आढावा
         ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या आयोजनाबाबत महापालिकेची तयारी सुरू आहे. या आयोजनात सुसूत्रता राहावी आणि जास्तीत जास्त ठाणेकर नागरिक त्यात सहभागी व्हावेत यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आयुक्त श्री. बांगर यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस अतिरीक्त आयुक्त (१) श्री. संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) श्री. प्रशांत रोडे, सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, सर्व उपक्रम समन्वयक उपस्थित होते.

          स्वच्छता पंधरवडा
        १५ सप्टेंबर ते ०२ऑक्‍टोबरपर्यंत साजरा होणारा स्वच्छता पंधरवडा हा- स्वच्छता ही सेवा २०२३ या उपक्रमाच्या स्वच्छता मोहिमेचा हा भाग आहे.हा पंधरवडा सुरू झाल्यापासून, या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमात आतापर्यंत देशभरात ०५ कोटीहून अधिक नागरिक सहभागी झाले आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 सुविधा प्रकल्पांच्या नावाने होणाऱ्या कांदळवनाच्या नुकसानीची तपासणी