श्री विसर्जनसोहळा निर्विघ्नपणे संपन्न

‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या'

नवी मुंबई ः ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या' अशा नामगजरात नवी मुंबई महापालिका मार्फत २२ नैसर्गिक आणि १४१ कृत्रिम अशा एकूण १६३ विसर्जन स्थळांवर करण्यात आलेल्या उत्तम व्यवस्थेमुळे अनंत चतुर्दशी दिनी पहाटे ४ वाजेपर्यंत चाललेला विघ्नहर्त्या श्रीगणरायाचा विसर्जनसोहळा निर्विघ्नपणे संपन्न झाला. महापालिका क्षेत्रात एकूण ५१९ सार्वजनिक आणि ८१२२ घरगुती अशा एकूण ८६४१ श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन उत्साहात संपन्न झाले.

अनंत चतुर्दशी दिनी होणाऱ्या श्रीमूर्ती विसर्जनामध्ये सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या आकाराच्या गणेशमूर्तींचा समावेश असल्यामुळे सर्व २२ नैसर्गिक विसर्जनस्थळांवर मोठ्या तरापयांसोबत फोर्कलिपटची व्यवस्था करण्यात आली होती. त्याअनुषंगाने बेलापूर विभागात ५ विसर्जन स्थळांवर ११९५ घरगुती आणि ४३ सार्वजनिक, नेरुळ विभागात २ विसर्जन स्थळांवर ८५८ घरगुती आणि ५४ सार्वजनिक, वाशी विभागात २ विसर्जन स्थळांवर ५६५ घरगुती आणि ६० सार्वजनिक, तुर्भे विभागात ३ विसर्जन स्थळांवर ६४५ घरगुती आणि ५३ सार्वजनिक, कोपरखैरणे मध्ये २ विसर्जन स्थळांवर ८२६ घरगुती आणि ९४ सार्वजनिक, घणसोली येथे ४ विसर्जन स्थळांवर १३२९ घरगुती आणि ११२ सार्वजनिक, ऐरोली विभागात ३ विसर्जन स्थळांवर ६३१ घरगुती आणी १२ सार्वजनिक तर दिघा विभागामध्ये एका विसर्जन स्थळी ५३८ घरगुती आणि ७१ सार्वजनिक  अशाप्रकारे ६५८७ घरगुती आणि ४९९ सार्वजनिक अशा ७०८६ श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने संपन्न झाले.

दरम्यान, कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण पोलीस यंत्रणा दक्षतेने कार्यरत होती. श्रीगणेश विसर्जन पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि स्वयंसेवक दक्षतेने कार्यरत होते.
श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करुन नागरिकांनी जपला पर्यावरणशील दृष्टीकोन...

नैसर्गिक जलस्रोतांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी कृत्रिम तलावांचा वापर करावा असे आवाहन करीत १४१ इतक्या मोठ्या संख्येने कृत्रिम विसर्जन तलवांची निर्मिती करण्यात आली होती. त्यालाही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कृत्रिम तलावांमध्ये १५५५ श्रीमूर्तींचे विसर्जन करीत नागरिकांनी पर्यावरणशीलतेचे दर्शन घडविले. यामध्ये १५३५ घरगुती आणि २० सार्वजनिक अशा एकूण १५५५ श्रीगणेशमूर्तींचे भक्तीमय निरोप देत विसर्जन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे श्रीमूर्तींवर मान्यवरांच्या हस्ते पुष्पवृष्टी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्यतम व्यासपीठावरुन विसर्जनस्थळाकडे प्रस्थान करणाऱ्या श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता संजय देसाई, प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, परिमंडळ-१चे उपायुक्त सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्यासह इतर अधिकारी आणि मान्यवरांनी श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करीत अभिवादन केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भास्कर मोकल यांच्या घरातील मखरास प्रथम क्रमांक