हवा गुणवत्ता चाचणी वाहन तैनात; मात्र, वायू प्रदूषणाचा मारा कायम

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

वाशी : वाशी सेक्टर-२६ परिसरात होणारे वाढत्या प्रदूषण पाहून या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ६ सप्टेंबर रोजी फिरते हवा गुणवत्ता चाचणी गस्ती वाहन तैनात केले आहे. परंतु, हवा गुणवत्ता चाचणी गस्ती वाहन तैनात केल्यानंतही वायू प्रदूषणाचा मारा कायम आहे. हवा गुणवत्ता चाचणी गस्ती वाहनात वायू प्रदुषणाच्या नोंदी नोंदवल्या असून, त्यांनी पातळी ओलांडली आहे. मात्र, याची अधिकृत माहिती देण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळ टाळाटाळ करत असल्याने प्रदूषणकारी कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळ पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे का?, असा सवाल स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे .

खैरणे, पावणे एमआयडीसी मधील रासायनिक कारखान्यांमधून रात्री अपरात्री प्रदूषित वायू सोडले जातात. त्याचा नाहक त्रास वाशी सेक्टर-२६, कोपरी गाव तसेच खैरणे परिसरातील नागरिकांना होत असून, त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे वायू प्रदूषण करणाऱ्या कारखांन्यांविरुध्द कारवाई करावी, याकरिता वाशी सेक्टर-२६ मधील रहिवासी सातत्याने आवाज उठवत आले आहेत. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मार्फत वाशी सेक्टर-२६, कोपरी गाव येथील वायू प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी कोपरी येथे ६ सप्टेंबर २०२३ रोजी फिरते हवा गुणवत्ता चाचणी वाहन कार्यान्वित करण्यात आले आहे. फिरते हवा गुणवत्ता चाचणी वाहन तैनात करताच वाशी सेक्टर-२६, कोपरी गाव येथील वायू प्रदूषणात घट झाल्याचे समोर आले होते. मात्र, मागील चार-पाच दिवसांपासून पुन्हा एकदा वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. फिरते हवा गुणवत्ता चाचणी वाहनात वायू प्रदूषणाच्या नोंदी झाल्या असून, त्यांनी पातळी ओलांडली आहे. मात्र, याबाबत ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ'चे नवी मुंबई उप प्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांच्याकडे अधिकृत नोंदी मागितल्या असता नोंदी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे प्रदूषणकारी रासायनिक कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळ पाठीशी घालत आहे का?, असा प्रश्न स्थानिक रहिवाशी उपस्थित करीत आहेत. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘श्रीे' विसर्जनासाठी महापालिका तर्फे नियोजन