मोरबे धरण जलपूजन प्रकरण वादाच्या भोवऱ्यात

महापालिका पाणीपुरवठा विभाग अभियंत्यांना आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस

तुर्भे : नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या परवानगीविना मोरबे धरणावर ‘नवी मुंबई'चे माजी महापौर तथा माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक आणि इतर माजी नगरसेवक यांनी जलपूजन केले. याप्रकरणी संबंधित महापालिका पाणीपुरवठा विभाग अभियंत्यांना खुलासा सादर करण्याची नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.

यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे खालापूर तालुवयातील मोरबे धरण २४ सप्टेंबर रोजी काठोकाठ भरल्याचे महापालिका प्रशासनाने घोषित केले. त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून जलपूजनाचा होणारा कार्यक्रम अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही, असे महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले होते. परंतु, कोणतेही पद नसणाऱ्या माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह उपस्थित माजी नगरसेवक यांनी २४ सप्टेंबर रोजी मोरबे धरण परिसरात प्रवेश करुन मोरबे धरणाचे जलपूजन केले. सध्या नवी मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधी कोणी नाही. महापालिका मध्ये प्रशासकीय राजवट असून महापालिका आयुक्त प्रशासक आहेत. वास्तविक पाहता मोरबे धरणाच्या कार्यक्षेत्रात कोणाही सर्वसामान्यांना प्रवेश बंदी आहे. मोरबे धरण परिसर पूर्णपणे प्रतिबंधित विभाग आहे. येथे महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, महापालिका प्रशासनाला पूर्वसूचना न देता प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या मोरबे धरणाच्या परिसरात अनधिकृरीत्या प्रवेश करुन जलपूजन करणारे माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह उपस्थित माजी नगरसेवक आणि इतरांवर तात्काळ गुन्हे नोंद करण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या संदर्भात नवी मुंबई जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या कार्यालय बाहेर २५ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन केले होते. त्यावर महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी संबंधित महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या सर्व अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

महापालिका प्रशासनाच्या अनुमती शिवाय करण्यात आलेल्या मोरबे धरण जलपूजन प्रकरणी महापालिका पाणीपुरवठा विभाग अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीशीला उत्तर आल्यावर पुढची योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. - राजेश नार्वेकर, आयुवत -  नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

हवा गुणवत्ता चाचणी वाहन तैनात; मात्र, वायू प्रदूषणाचा मारा कायम