खारघर मध्ये श्रीगणेशोत्सवात धार्मिक देखाव्यांवर भर

प्रथमच केदारनाथ, शनिवार वाडा, चांद्रयान देखावा आकर्षण

खारघर : खारघर मधील सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांनी केदारनाथ, शनिवार वाडा, विज्ञान क्षेत्रातील शास्त्रज्ञ, चांद्रयान मोहीम आणि प्रति लालबागचा राजाची भव्य मूर्ती साकारली असून, पर्यावरण पूरक देखावा उभारण्यात भर दिल्याचे चित्र दिसत आहे.

खारघर शहराच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस भर पडत असून, श्रीगणेशोत्सवातील विविध नावीन्यपूर्ण गणेशोत्सवात खारघर मध्ये जल्लोष पहायला मिळत आहे. ‘खारघरचा राजा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर सेक्टर-१२ मधील गणेश मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी यावर्षी केदारनाथ मंदिराचा देखावा तयार केला आहे. मंडपात प्रवेश करताच दहा फूट शंकराची मूर्ती समोर नंदी आणि भव्य गणेश मूर्ती तसेच देखावा पाहण्यासाठी भक्तांची गर्दी होत आहे. तर ‘मनसे'चे पदाधिकारी केशरीनाथ पाटील यांच्या श्री गणेश मित्र मंडळाने खारघर मधील सर्वात वर्दळीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘शिल्प चौकचा राजा' गणेशमूर्ती सभोवती केदारनाथ  देखावा तयार केला असून, दोन्ही बाजूने जगभरात विज्ञान क्षेत्रात शोध घेणारे शास्त्रज्ञ आणि त्यांचे कार्य याविषयी केलेला देखावा सध्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. डेली बाजार समोरील चौकात शिवसेनेच्या (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) नवनिर्माण सेवा मंडळाचे प्रसाद परब यांनी प्रथमच साकारलेली २१ फूट उंचीची भव्य श्रीमूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

खारघर सेवटर-१९ मध्ये  शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत स्वामी समर्थ कृपा मित्र मंडळाने भव्य श्रीमूर्ती प्रतिष्ठापित करण्यासोबत पर्यावरण पूरक देखावा साकारला आहे. खारघर सेक्टर-१२ मध्ये शिवसेनेचे अवचित राऊत यांच्या मंडळाने भव्य ‘श्रीमूर्ती'ची प्रतिष्ठापना केली असून, खारघर सेक्टर-१० मध्ये माजी पनवेल महापालिका स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या सार्वजनिक गणेश मंडळाने भव्य श्रीमूर्ती साकारुन पर्यावरण पूरक देखावा उभारला आहे. खारघर सेवटर-१९ मध्ये श्री महालक्ष्मी व्यापारी वेल्फेअर असोसिएशन आणि सिध्दीविनायक उत्सव मित्र मंडळाचे पदाधिकारी गुरु ठाकूर आणि फुलाजी ठाकूर यांनी पर्यावरण पूरक देखावा आणि प्रति लालबागचा राजाची प्रतिकृती साकारली आहे. तर खारघर मध्ये खारघर युथ फाउंडेशन  मंडळाने पुणे येथील ऐतिहासिक शनिवार वाड्याची हुबेहूब प्रतिकृती रेखाटली आहे. खारघर सेक्टर-२१ रहिवाशी विकास मंडळाने चांद्रयान-३ मोहिमचा देखावा प्रदर्शित केला आहे. खारघर सेक्टर-१२ मधील शिवगर्जना मित्र मंडळाने मंडपात भव्य श्रीमूर्ती प्रतिष्ठापित करुन चोहोबाजूंनी शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांचे चित्र रेखाटले आहे. खारघर सेक्टर-११ मध्ये खारघर नगर रहिवासी सेवा संस्थेने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. खारघर मध्ये प्रथमच केदारनाथ, शनिवार वाडा आणि चांद्रयान देखावा भवतांचे आकर्षण ठरत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘झाडे वाचवा, झाडे जगवा'