पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये स्वच्छता पंधरवडा
स्वच्छता ही सेवा अंतर्गत 1 ऑक्टोबरला स्वच्छता मोहिम
पनवेल : केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे स्वच्छ भारत अभियानाची पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनूसार महानगरपालिकेच्यावतीने मा. आयुक्त् गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अंतर्गत दिनांक 15 सप्टेंबर 2023 ते दिनांक 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधीमध्ये ‘स्वच्छता पंधरवडा – स्वच्छता ही सेवा 2023’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधुन दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी महापालिका कार्यक्षेत्रात 'एक तारीख - एक तास, एक साथ श्रमदान' हा स्वच्छता उपक्रम मोठ्या प्रमाणत राबविण्यात येणार आहे. शहराच्या स्वच्छतेत नागरिकांचा सहभाग वाढवा या उद्देशाने स्वच्छता मोहिमेचे आयोजन हे करण्यात आले आहे.
संपुर्ण देशामध्ये दिनांक 01ऑक्टोंबर रोजी ही मोहिम राबविली जाणार आहे. या दिवशी सकाळी 10.00 वाजता पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागांतर्गत उद्याने, स्मशानभुमी, तलाव, हायवे, बाजारपेठा, बसस्टॉप अशा 40 ठिकाणी ही स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये ही स्वच्छता मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी शाळा , महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वंयसेवी संस्था, बचतगट व नागरिक यांना सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
‘स्वच्छता ही सेवा’ या पोर्टलवरच्या या https://swachhatahiseva.com/ लिंकवरती गेल्यास नागरिकांना महापालिका कार्यक्षेत्रातील मोहिमेची 40 ठिकाणे नागरिकांना समजणार आहे. या मोहिमेसाठी घमेले,झाडू,कचरा गोळा करण्याच्या पिशव्या, मास्क , हॅण्ड ग्लोज , गवत कापण्याची यंत्रे, वाहने अशी सर्व तयारी करण्यात आली आहे. ही मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिकेच्यावतीने नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिनांक १ ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये सदर स्वच्छता मोहिम राबविण्यासाठी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे. याचबरोबर नागरिक स्वत:च्या सोसायट्यामध्येही ही स्वच्छता मोहिम राबवू शकतात.