मालमत्ताकर वसुली उद्दिष्ट पूर्तीसाठी गतीमान कार्यवाहीचे निर्देश

अतिरिवत आयुवत ढोले यांच्याकडून मालमत्ता कर विभागाचा आढावा

नवी मुंबई : मालमत्ता कर नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असून यामधून प्राप्त होणाऱ्या महसुलातूनच महापालिका क्षेत्रातील नागरी सेवासुविधा दर्जेदारपणे पुरविणे शक्य होते. त्यामुळे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे मालमत्ताकर वसूली कार्यवाहीकडे बारकाईने लक्ष आहे.

या अनुषंगाने मालमत्ताकर विभागाच्या प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी मालमत्ताकर विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांची विशेष बैठक घेत वसुलीचा विभागनिहाय लक्ष्यांक देत गतीमान कार्यवाहीचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे जे कर्मचारी कामात हलगर्जीपणा करताना आढळतील त्यांच्याबाबत आयुक्तांच्या निदर्शनास आणून देऊन प्रशासकीय कारवाई करण्याचेही स्पष्ट संकेत यावेळी देण्यात आले.

दर आठवड्याला कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा स्वतः आढावा घ्ोणार असल्याचे सांगत त्यांनी शहर विकासात मालमत्ताकराचे महत्व लक्षात घेऊन प्रत्येकाने टार्गेट नजरेसमोर ठेवून काम करा, अशा स्पष्ट सूचना दिल्या. कामात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा चालणार नाही, असेही त्यांनी निर्देशित केले.

चालू आर्थिक वर्षात अर्थसंकल्प सादर करताना आयुक्तांनी मालमत्ता कर विभागास ८०० कोटी रक्कमेचे उद्दिष्ट दिलेले आहे. त्यानुसार मालमत्ताकर विभाग वर्तमान वर्षातील करवसुलीप्रमाणेच थकबाकीदार मालमत्ताकर धारकांकडून थकीत मालमत्ताकर वसूली करण्याकडेही विशेष लक्ष देत आहे. या अनुषंगाने मोठ्या रक्कमेची थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांपासून उलट्या क्रमाने थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात मोठ्या रक्कमेच्या थकबाकीदारांकडील वसुलीला प्राधान्य देण्यात येत आहे.

या आर्थिक वर्षात १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत २३५ कोटी रुपयांची  मालमत्ताकर वसुली करण्यात आलेली आहे. यामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने थकबाकी वसुलीकडे प्राधान्याने लक्ष दिले जात असून त्यासोबतच नवीन मालमत्ता मालमत्ताकराच्या कक्षेत आणण्यावर भर दिला जात आहे. 

अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी या थकबाकीदारांच्या विभागनिहाय याद्यांचा आढावा घेत संबंधित कर्मचारी यांनी दोन दिवस कार्यालयीन कामकाज, दोन दिवस थकबाकी वसुलीचे काम आणि एक दिवस जप्तीविषयक काम अशी साप्ताहिक कार्यप्रणाली ठरवून घ्यावे आणि तशाप्रकारे आपल्याकडील कामाचे नियोजन करुन थकबाकी वसुलीवर गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे, असे आदेशित केले. यामध्ये निवासी क्षेत्राप्रमाणेच एमआयडीसी भागातील थकबाकी वसुलीवरही लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक विभागाला मालमत्ताकर वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करुन देत त्याच्या पूर्ततेसाठी संपूर्ण क्षमतेने काम करा आणि नागरिकांशी सतत संवादी राहून समन्वय राखत पाठपुरावा करा, असेही सूचित करण्यात आले.

मालमत्ताकर विभाग महापालिकेतील अत्यंत महत्वाचा विभाग असून या विभागात आपल्याला काम करण्याची संधी मिळाली याचे महत्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी जाणावे आणि तशा प्रकारचे काम करावे. प्रत्येकाने आपली संपूर्ण क्षमता कामात वापरावी. यापुढील काळात प्रत्येकाच्या कामाचे साप्ताहिक मूल्यमापन केले जाईल. -सुजाता ढोले, अतिरिवत आयुवत तथा मालमत्ता कर विभागप्रमुख, नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये स्वच्छता पंधरवडा