सत्याग्रहातील हुतात्म्यांना शासकीय मानवंदना

चिरनेर जंगल सत्याग्रह हुतात्म्यांचा ९३ वा स्मृतीदिन साजरा

उरण : गौरवशाली आणि शौर्यशाली लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचा ९३ वा स्मृतीदिन कार्यक्रम २५ सप्टेंबर रोजी चिरनेर गावातील स्मृती स्तंभाजवळ मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी हुतात्म्यांना शासकीय मानवंदना, सलामी म्हणून उरण पोलिसांकडून बंदुकीच्या २१ फैऱ्या हवेत झाडण्यात आल्या.

ब्रिटीश सत्तेविरोधात शांततेच्या मार्गाने लढल्या गेलेल्या रणसंग्रामात उरण तालुक्यातील धाकू गवत्या फोफेकर, नाग्या महादू कातकरी ( चिरनेर), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), रामा बामा कोळी ( मोठीजुई), मोरेश्वर रघुनाथ शिंदे (न्हावी) (कोप्रोली), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसुराम बुध्दाजी घरत (खोपटे) या आठ शूरवीरांना चिरनेर गावातील आक्कादेवीच्या माळरानावर वीर मरण प्राप्त झाले. या रणसंग्रामाच्या स्मृतींना उजाळा मिळावा आणि युवा पिढी समोर आपल्या पूर्वजांच्या इतिहासाचे स्मरण व्हावे यासाठी चिरनेर ग्रामपंचायत आणि ‘रायगड जिल्हा परिषद'च्या वतीने स्मृतीदिन कार्यक्रम २५ सप्टेंबर रोजी साधेपणाने साजरा करण्यात आला.
यावेळी हुतात्म्यांना शासकिय मानवंदना, सलामी म्हणून उरण पोलीस यंत्रणेकडून हवेत बंदुकीच्या २१ फैऱ्या झाडण्यात आल्या. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्मृती स्तंभाजवळ पुष्पचक्र आणि हुतात्म्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांकडून आणि ‘वनवासी कल्याण आश्रम'च्या पदाधिकाऱ्यांकडून अक्का देवी येथील हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून आमदार महेश बालदी, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'चे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, कामगार नेते भूषण पाटील, उद्योगपती पी. पी. खारपाटील, राजाशेठ खारपाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, माजी सभापती भास्कर मोकल, ‘उरण'चे तहसीलदार डॉ. उध्दव कदम, विस्तार अधिकारी विनोद मिंडे, मनोज भगत, ‘पनवेल वृÀषि उत्पन्न बाजार समिती'चे अध्यक्ष नारायणशेठ घरत, ‘काँग्रेस'चे तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, ‘शेकाप'चे पनवेल चिटणीस तथा माजी सभापती राजेश केणी, नरेश घरत, माजी उपसभापती सौ. शुभांगी सुरेश पाटील, महेंद्र ठाकूर, ‘भाजा'चे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ‘उरण'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्यासह हुतात्म्यांचे वारस, ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.

इतिहास प्रसिध्द चिरनेर गावातील जनतेला अनेक नागरी समस्यांचा सामना करावा लागत असून गावावर पुर परिस्थितीचे संकट ओढावत आहे. तरी राज्य सरकार, केंद्र सरकार देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या चिरनेर गावातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने ग्रामस्थांनी यावर्षी हुतात्मा स्मृती दिन कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी यावर्षीही रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषद, उरण पंचायत समिती, उरण तहसील कार्यालयातील अधिकारी वर्ग उपस्थित न राहिल्याने चिरनेर गावातील ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

साता समुद्रापार देखील श्रीगणेशोत्सव जल्लोषात साजरा