एपीएमसी येथे माथाडी कामगारांचा मेळावा संपन्न

माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत शासन गंभीर - फडणवीस

नवी मुंबई : माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत आम्ही खूप गंभीर आहोत. अण्णासाहेबांची जयंती म्हणजे माथाडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे व्यासपीठ आहे. अण्णासाहेबांनी अथक संघर्षातून निर्माण केलेल्या कायद्याचा आत्मा आम्ही मरु देणार नाही आणि बदलूही देणार नाही. माथाडी कायद्याची छेडछाडही आम्ही करणार नाही अथवा रद्दही करणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एपीएमसी येथे दिली.

 ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'च्या वतीने माथाडी कायद्याचे जनक कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९० व्या जयंती निमित्त एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटच्या प्रांगणात आयोजित माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून ना. फडणवीस बोलत होते.


कायद्याला बदनाम करणाऱ्यांचा लवकरच बंदोबस्त...
फेक माथाडी कामगार आणि खंडणी वसूल करणाऱ्यांना जेलबंद करता आले पाहिजे, त्यासाठी माथाडी कामगार आणि नेत्यांनी चर्चा करुन माथाडी कायद्यात योग्य ते बदल सुचवावेत. जेणेकरुन खंडणीखोर आणि फेक माथाडी कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत. आम्ही शासनामार्फत त्यांच्यावर कारवाई केली; पण कायद्यातील पळवाटांमुळे ते सुटतात. म्हणूनच माथाडी कायद्यात अशा लोकांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी योग्यते बदल सुचवा. कायद्याला बदनाम करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘सिडको'च्या माध्यामातून ‘अण्णासाहेब पाटील मागास आर्थिक विकास महामंडळ'ला ५ एकर भूखंड ‘सिडको'कडून मिळण्यासाठी पाठपुरावा करु. तसेच माथाडी कामगारांच्या शिक्षित मुलांना माथाडी मंडळाच्या कार्यालयात नोकरी देण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करु आणि ती कार्यान्वीतही होईल. ‘सिडको'मार्फत ट्रक टर्मिनलच्या जागेवर राबविल्या जाणाऱ्या घरकुलात माथाडी कामगारांना घरे देण्याचे आदेश ‘सिडको'ला दिले जातील, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माथाडींच्या अन्य समस्यांवर बोलताना सांगितले.
सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. आम्ही न्यायालयात न्यायप्रविष्ठ असलेल्या या प्रकरणाची सरकार मार्फत योग्य बाजू मांडून आणि त्याला कायद्याच्या चौकटीत बसवून सोडविण्याचा प्रयत्न करु, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

माथाडी कामगार नेते सरचिटणीस तथा ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ'चे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणातून कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी माथाडी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक आणताना आत्मपरीक्षण करायला पाहिजे होते, पण ते केले गेले नाही. माथाडी कायद्यात कामगार हिताविरोधी काहीही बदल करु देणार नाही. आमची विश्वासाहर्ता माथाडी कामगार चळवळ आणि माथाडी कामगारांशी निगडीत असून आम्ही कामगारांशी बेईमानी कधीही करणार नाही. आज माथाडींच्या नावावर लूटमार, खंडणी वसूल करणाऱ्यांना पोलीस यंत्रणेने गजाआड केले पाहिजे, अशी आमची मागणी गेल्या कित्येक वर्षांची असून ती देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून तत्परतेने सोडवावी. आमच्या प्रलंबित मागण्यांचाही लवकरात लवकर विचार करुन त्या सोडवाव्यात, अशी विनंतीही नरेंद्र पाटील यांनी ना. फडणवीस यांना यावेळी केली.

काही अपप्रवृत्तीचे लोक माथाडी कायद्यात बदल करावेत म्हणून लढत असले तरी व्यापाऱ्यांनीच आमच्यावर माथाडी कायदा लावा, अशी मागणी ‘युनियन'चे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी केली. माथाडी कायद्यातील सुधारणेच्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी संयुक्त चिकित्सा समिती नेमली आहे. त्या समितीने विविध संघटनांच्या नेत्यांनाही विश्वासात घ्यावे, असेही आ. शिंदे म्हणाले.


यावेळी ‘युनियन'चे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी प्रास्ताविकातून माथाडी कामगारांच्या विविध समस्या मांडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘युनियन'चे जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी केले. सदर मेळाव्यास आमदार गणेश नाईक, आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, आमदार प्रविण दरेकर, निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, ‘एपीएमसी'चे सभापती अशोक डक, सचिव पी. एन. खंडागळे, माथाडी हॉस्पीटलचे डॉ. हणमंतराव पाटील, रमेश पाटील, ‘युनियन'चे अध्यक्ष एकनाथ सखाराम जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, दिलीप खोंड, कायदेशिर सल्लागार ॲड. भारती पाटील, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ‘अण्णासाहेब पाटील महामंडळ'चे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते, बाजार समिती आवारातील व्यापारी प्रतिनिधी, बाजार समितीचे संचालक, माजी नगरसेवक, माथाडी मंडळाचे अधिकारी, आदि उपस्थित होते.

सदर मेळाव्यात १८ गुणवंत माथाडी कामगारांना माथाडी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रुपेश कोंढाळकर या माथाडी कामगाराच्या मुलाचा खो-खो स्पर्धेतील विजेता म्हणून सत्कार करण्यात आला. तसेच ‘युनियन'च्या वेबसाईटचे उद्‌घाटन तसेच माथाडी मित्र पाक्षिकाचे पुनःप्रकाशन यावेळी करण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सत्याग्रहातील हुतात्म्यांना शासकीय मानवंदना