एपीएमसी येथे माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन

 मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार यांच्यासह विविध मान्यवर राहणार उपस्थित

नवी मुंबई : ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीचे संस्थापक आणि माथाडी कामगारांचे भाग्यविधाते, आराध्यदैवत कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९० व्या जयंती निमित्त २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता एपीएमसी मधील कांदा-बटाटा लिलावगृह येथे माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, कामगार मंत्री सुरेश खाडे, उद्योग मंत्री उदय सामंत, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती  ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'चे नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिली.

या मेळाव्यात गुणवंत कामगारांना माथाडी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून, ‘युनियन'च्या वेबसाईटचे आणि माथाडी मित्र पाक्षिकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.  
असुरक्षित आणि असंघटीत अशा कष्टकरी कामगारांना संघटीत करुन कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी त्यांची बलाढ्य अशी संघटना स्थापन केली. त्यांनी शासनाकडून माथाडी कायदा आणि माथाडी बोर्डांची निर्मिती केली. कामाचे योग्य दाम आणि विविध सुविधा उपलब्ध करुन कष्टकरी माथाडी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करुन दिले. अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळण्यासाठी प्राणाचे बलिदान दिले, अशा या आराध्यदेवताला आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रातील तमाम माथाडी कामगार एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट येथे येतात. यावर्षी देखील तमाम माथाडी कामगार, त्यांचे कुटुंबिय आणि हितचिंतक यांनी हजाराेंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केले आहे.

माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करा. त्यावर अनुभवी कामगार नेत्यांची सदस्य म्हणून नेमणूक करा, माथाडी बोर्डांची पुनर्रचना करुन त्यावर नोंदीत कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ‘युनियन'च्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका कराव्यात. माथाडी मंडळात नोंदीत कामगारांच्या शिक्षित मुलांना नोकरीत घ्यावे. माथाडी अधिनियमात सुधारणा करणारे विधयेक क्रमांक. ३४ मागे घ्यावे. खऱ्या माथाडी कामगारांना न्याय द्यावा. माथाडी कायद्याचा गैरवापर करुन गुंडगिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा. माथाडी कामगारांना नवी मुंबईत ‘सिडको'मार्फत घरे द्यावीत यासह अन्य मागण्या माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मांडणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, या माथाडी कामगार मेळाव्यामध्ये स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या माथाडी कामगारांची आम्ही ताकद दाखवून, कामगार विभागाने माथाडी कामगारांच्या विरोधात जो कायदा करण्याचा घाट घातला आहे, तो हाणून पाडू, असे नरेंद्र पाटील यावेळी म्हणाले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी येथे माथाडी कामगारांचा मेळावा संपन्न