स्वच्छताकर्मींना आरतीचा मान!

घणसोलीतील ‘श्री शिवसाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ'कडून सेवाकार्याचा गौरव

नवी मुंबई : गणेशोत्सवामध्ये विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून गणेशोत्सव मंडळे एकात्मतेचा आणि समाज प्रबोधनाचा वारसा जपत असतात. त्यातही काही मंडळे वेगळ्या प्रकारचे अभिनव उपक्रम राबवून आपले वेगळेपण सिध्द करताना दिसतात.

अशाच प्रकारचे वेगळेपण घणसोलीतील ‘श्री शिवसाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ'ने दाखवून दिले आहे. सर्वसाधारणपणे श्रीगणेशोत्सवातील आरतीचा मान मंडळाचे पदाधिकारी, मान्यवर लोकप्रतिनिधी अथवा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते करण्याची गणेशोत्सव मंडळाची परंपरा असते. या परंपरेला छेद देत ‘श्री शिवसाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ'ने गणेशोत्सवातील श्रींच्या आरतीचा बहुमान नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छताकर्मींना देऊन आपले सामाजिक बांधिलकीतील वेगळेपण दाखवून दिले आहे.
स्वच्छता नवी मुंबईची ओळख असून नवी मुंबई महापालिकेने राष्ट्रीय पातळीवर स्वतःचे मानांकन कायम उंचावत ठेवले आहे. यामध्ये महापालिका स्वच्छताकर्मी सेवाभावी वृत्तीने दररोज करीत असलेल्या कामाचा सर्वात महत्त्वाचा वाटा असून दिवसरात्र तिन्ही ऋतुंमध्ये स्वच्छताकर्मी शहर स्वच्छतेची आपली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत असतात. त्यांच्या या समर्पित भावनेने केलेल्या कामामुळेच नवी मुंबई महापालिका स्वच्छतेमध्ये नेहमीच आघाडीवर राहिली आहे.

त्यामुळे या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करीत आणि त्यांच्या कामाबद्दल एक प्रकारची कृतज्ञता व्यवत करीत घणसोली येथील ‘श्री शिवसाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ'ने त्यांना आरतीचा बहुमान देऊन त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव तर केलाच; शिवाय श्रमप्रतिष्ठेचे मूल्य अधिक उंचावले आहे. या कृतीबद्दल शिवसाई गणेशोत्सव मंडळ घणसोली यांची सर्व स्तरातून प्रशंसा करण्यात येत आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी येथे माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन