खोपटा गावातील गौरा उत्सव बनले भाविकांचे श्रध्दास्थान

‘गौरा मंडळ'च्या वतीने खोपटा गावातील शिव मंदिरात गणेशोत्सवाचे औचित्य साधून  गौरा (शंकर, पार्वती आणि श्री गणेश) मुर्तीची प्रतिष्ठापना

उरण : रुढी परंपरा यांचे जतन करण्यासाठी खोपटा गावातील शिव मंदिरात गणेशोत्सवाचे औचित्य साधून याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने गौरा (शंकर, पार्वती आणि श्री गणेश) मुर्तीची प्रतिष्ठापना ‘गौरा मंडळ'च्या वतीने २२ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. गौरा उत्सव ८२ वर्षात पदार्पण करत असल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, ग्रामस्थांनी सामाजिक भावनेतून खोपटा गावात विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत.

स्वातंत्र्य काळात रहिवाशांमध्ये एकोपा निर्माण व्हावा यासाठी १९४१ साली खोपटा पाटील पाडा येथील रामजी तुकाराम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामस्थ मंडळाची स्थापना करुन गौरा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. आज देखील या मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आपल्या आजोबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून खोपटा गावात गौरा म्हणजे शंकर, पार्वती आणि गणपती याची एकत्रित शिवगौऱ्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा, धार्मिक विधी करुन करत आहेत. पाच दिवस साजरा होणाऱ्या उत्सवामध्ये विविध सामाजिक उपक्रम, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत.

‘गौरा उत्सव'च्या पहिल्या दिवशी मात्र महिलावर्गाला दर्शन दिले जात नाही. त्याचे कारण म्हणजे शिव शंकराला त्या दिवशी बांगडीच्या आवाजाने नृत्यामध्ये भंग होऊ नये म्हणून महिला वर्ग पहिल्या दिवशी दर्शनास जात नाहीत. त्या परंपरेचं जतन महिला भगिनी आजही करत आहेत. रात्री १२ वाजता शिव गौरा एका पुरुषाच्या अंगात येत असल्याने तो महिमा बघण्यासाठी उरण परिसरातील तरुण वर्गाने यावेळी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती.

शिव मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या ‘शिव गौऱ्या'च्या मूर्ती सोबत पेंटर भालचंद्र दत्तात्रेय म्हात्रे यांनी सुंदर देखावा सादर केला आहे. ‘गौरा उत्सव'चे औचित्य साधून मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरातील शिवलिंग आणि गौराच दर्शन, गोरा कुंभार या चल चित्राचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. बाल्या नाच सह धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय यावर्षीही उत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी घेतला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील, सत्यवान भगत यांनी दिली आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्वच्छताकर्मींना आरतीचा मान!