गणेशोत्सवात घरोघरी महिला वर्गाकडून फेऱ्यांची गाणी

गावाचे गावपण टिकवणारी फेऱ्यांची गाणी

नवी मुंबई : फेर काय धरियेला, फेर काय धरियेला गणाचे बैठकीला, पाणी उरला कैलासाला पाणी उरला कैलासाला अशी गाणी सध्या रात्री कानावर हमखास पडताना दिसत आहे. सध्या गणेशोत्सवाची धूम सुरूअसून जागरण निमित्त घरो घरी महिला वर्गाकडून अशी फेऱ्यांची गाणी गायली जात आहेत.

गणेशोत्सव आणि कोकण याच अतूट नाते आहे. त्यामुळे तळ कोकणात जशी  परंपरा आहे तशीच परंपरा नवी मुंबई शहरातील गावा गावातील ग्रामस्थांनी जपली आहे. गणपती आले की घरो घरी देवाचे जागरण केले जाते. कुठे भजन, कुठे  बाल्या नाच तर कुठे शक्ती तुऱ्यांचा सामना. मात्र महिला वर्ग  जागरणासाठी फेऱ्यांच्या गाण्याला अधिक पसंती देतात. यामध्ये घरातील महिला देवा समोर गोल रिंगण करून आपली पारंपरिक जुनी गाणी गात फेरा धरतात आणि याच फेऱ्यात फिरत नाच करतात अशी गाणी घरातील ज्येष्ठ महिला गात असतात. आज नवी मुंबई सारख्या शहरात गावांनी कात टाकली असून काँक्रिटचे इमले उभे राहिले आहेत. मात्र अशा इमाल्यात देखील येथील स्थानिक महिलांनी आपली सणांची परंपरा कायम ठेवत तो वारसा नव्या पिढीला देण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात आजही सण उत्सवात गावांचे गावपण टिकवून ठेवले  आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खोपटा गावातील गौरा उत्सव बनले भाविकांचे श्रध्दास्थान