रेवस-करंजा सेवेच्या वाढीव भाड्याला त्वरित स्थगिती द्या

‘ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशन'ची शासनाकडे मागणी

नवी मुंबई : मागील आठवड्यापासून रायगड जिल्ह्यातील रेवस ते करंजा या दिड ते पावणे दोन कि.मी. अंतराच्या जलमार्गावर चालणाऱ्या तर सेवेच्या (छोटी बोट) भाड्यात ५० टववयांनी वाढ करत २० वरुन थेट ३० रुपये केली आहे. सदर मार्गावर रोज दिड ते अडीच हजार प्रवासी नियमितपणे प्रवास करतात. त्यामुळे या भाडेवाढीमुळे प्रवाशांना भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या भाडेवाढीला त्वरित स्थगिती द्यावी, अशी मागणी ‘ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशन'चे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी शासनाचे बंदरे-वाहतूक विभागाचे प्रधान सचिव पराग जैन आणि ‘महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

रेवस-करंजा तर जलमार्ग सेवेने अलिबाग आणि उरण असे दोन तालुके थेट जोडले गेले आहेत. अलिबाग, मुरुड तालुक्यातील प्रवाशांना उरण, नवी मुंबई, ठाणे, मुंबईला जोडणारा सदरचा जवळचा आणि सुलभ मार्ग आहे. तसेच उरण तालुक्यातून जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबाग येथे शासकीय आणि खाजगी कार्यालये गाठण्यासाठी सदर सेवा फायदेशीर आणि वेळ वाचविणारी ठरते. भाजीपाला, फळफळावळ आणि अन्य व्यापारातील विक्रेत्या महिला आणि पुरुष यांची वाहतूक देखील या मार्गावर लक्षणीय आहे. मात्र, सेवेत अचानक भाडेवाढ करण्यात आली आहे.

त्यामुळे या भाडेवाढीचा फटका या घटकांबरोबरच समाजातील सर्व थरातील नागरिकांना बसत आहे. तरी सदर सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन केलेली भाडेवाढ रद्द करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी ‘एआयपीए'चे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी  बंदरे-वाहतूक विभागाचे प्रधान सचिव पराग जैन आणि ‘मेरीटाईम बोर्ड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांना पत्राद्वारे केली आहे. यापूर्वी ‘रायगड जिल्हा परिषद'चे कार्यकारी अभियंता यांच्या मार्फत भाडेवाढीचा निर्णय घेण्यात येत होता. मात्र, दरवेळी २ ते ४ रुपयांपेक्षा जास्त भाडेवाढ कधीच झाली नाही. मात्र, आता थेट ५० % अशी भरमसाठ भाडेवाढ केल्याने प्रवासी कोंडीत पकडले गेले आहेत, अशा संतप्त भावना या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गणेशोत्सवात घरोघरी महिला वर्गाकडून फेऱ्यांची गाणी