‘एसआरए'द्वारे झोपडपट्ट्यांचा विकास

ऐरोलीतील चिंचपाडा येथून झोपडीधारकांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात

नवी मुंबई : नवी मुंबईतील एमआयडीसी विभागातील झोपड्यांचा ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण'च्या योजनेच्या (एसआरए) माध्यमातून पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यानुसार २१ सप्टेंबर पासून ‘एसआरए'च्या आठ सदस्यीय पथकामार्फत ऐरोली येथील चिंचपाडा येथून झोपडी धारकांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. या पथकाने पहिल्याच दिवशी १९३  घरांवर क्रमांक टाकले असून त्यातील ४० जणांनी संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केली आहे.

नवी मुंबईतील एमआयडीसी भागात १३० हेक्टर जमिनीवर झोपडपट्ट्या वसल्या आहेत. या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास व्हावा यासाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले मागील चार-पाच वर्षापासून पाठपुरावा करत आहेत. अखेरीस विजय चौगुले यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून दोन आठवड्यापूर्वी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत पार पडलेल्या बैठकीत ‘एमआयडीसी'च्या जागेवरील झोपड्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या झोपड्यांचा ‘झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण योजना'च्या माध्यमातून पुनविकास करण्यात येणार आहे. या योजनेचा जवळपास ३५ हजार झोपडीधारकांना याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी येथील झोपडी धारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यानुसार ‘एसआरए'च्या आठ सदस्यीय पथकामार्फत २१ सप्टेंबर रोजी ऐरोलीतील चिंचपाडा येथून झोपडी धारकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. या सर्वेक्षणात पहिल्याच दिवशी १९४ घरांवर क्रमांक टाकण्यात आले. त्यातील ४० झोपडी धारकांनी संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केली असून इतर झोपडी धारकांना यावेळी अर्जाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रेवस-करंजा सेवेच्या वाढीव भाड्याला त्वरित स्थगिती द्या