एक गांव एक गणपती!


आधुनिक शहरात आग्रोळी गावाने ६३ वर्षापासून जोपासलीय संकल्पना

नवी मुंबई : आग्रोळी गावातील कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांच्या संकल्पनेतून १९६१ पासून ‘एक गांव एक गणपती'ची संकल्पना आजच्या पिढीकडून देखील तितक्याच मनोभावे जोपासली जात आहे. अत्याधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात एक गांव एक गणपती अशी संकल्पना अनेकांना अप्रुप करण्यासारखी आहे.

विशेष म्हणजे या संकल्पनेमुळे वर्षभरातील वादविवाद विसरुन जाऊन सर्व एकत्रित येऊन ग्रामस्थ गणपती उत्सव साजरा करतात. २९ गावांपैकी आग्रोळी गांव असे आहे की ज्यांच्याकडून सलग ६३ वर्षांपासून सदरचा एकोपा टिकवला जात आहे. ‘एक गांव एक गणपती'ची परंपरा अविरत अखंडपणे जपणारे गांव म्हणून आग्रोळी संपूर्ण नवी मुंबईत प्रसिध्द आहे.

लोकमान्य टिळकांना अपेक्षित असणारा सार्वजनिक गणेशोत्सव बेलापूर विभागातील आग्रोळी गावात पहायला मिळत आहे. या गावात ‘एक गांव एक गणपती' या संकल्पनेतून गणेशोत्सव साजरा केला जात असून, या उत्सवाचे यंदाचे ६३ वे वर्ष आहे. या गावात १५० कुटुंबे आहेत. दरडोई दीड हजार रुपये वार्षिक देणगी जमवली जाते. गणेशोत्सवा दरम्यान ११ दिवस भजन, कीर्तन तसेच मुलांसाठी विविध स्पर्धा आणि कार्यक्रम राबवले जातात. कोणताही डामडोल न करता गावकीच्या लोकसहभागातून गणेशोत्सव  साजरा केला जातो.

कॉर्पोरेट हब म्हणून ओळख असणाऱ्या नवी मुंबईत सीबीडी-बेलापूर मधील पारसिक हिलच्या पायथ्याशी आग्रोळी गांव वसलेले आहे. एकेकाळी या गावाची उभ्या महाराष्ट्रात मावर्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा गड अशी ओळख होती. ठाणे-बेलापूर पट्टीत १९६१ मध्ये प्लेगची साथ आली होती. प्लेग या भीषण रोगाने रौद्र रुप धारण केले होते. बेलापूरपट्टीत भात शेतीशिवाय दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. अशात प्लेगच्या आजारामुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. यामुळे घरातील गणरायाची स्थापना कशी करायची? असा प्रश्न गावातील प्रत्येक कुटुंबाला पडला होता. यावर उपाय म्हणून पंचक्रोशीत मान असलेले गावातीलच कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांनी गावकऱ्यांसमोर ‘एक गांव एक गणपती'ची संकल्पना मांडली.

सुरुवातीला ग्रामस्थांनी याबाबतची मनातील भिती कॉम्रेड भाऊ पाटील यांना बोलून दाखवली. गणपतीची स्थापना न केल्यास देव कोपेल, अशा प्रकारची भिती समस्त ग्रामस्थांना होती. यावरही उपाय म्हणून कॉम्रेड पाटील यांनी स्वतःच्याघरातील मूर्तीपुजन बंद करुन गावाच्या मंदिरात पुजन करत पुढाकार घेतला. परिणामी, कॉम्रेड पाटील यांची भूमिका ग्रामस्थांना पटली. या परिवर्तनानंतर ग्रामस्थांनी जे ठरवले ते आजतागायत निरंतरपणे सुरु असल्याचे ‘एक गांव एक गणपती मंडळ'चे अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी सांगितले.

आग्रोळी गावातील एकही ग्रामस्थ ‘एक गांव एक गणपती' संकल्पनेच्या विरोधात न जाता ‘एक गांव एक गणपती'ची संकल्पना मनोभावे जोपासत आहे. रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण गांव गणपती बाप्पाच्या भक्तीत लिन असतो. रात्री १२ च्या आरती नंतर मोजकीच मंडळी सभा मंडपात उपस्थित राहतात.गावातील एकोपा आजही नव्या पिढीला आदर्शवत ठरवला जात आहे. गावात गौराईचे पुजन अनेकांच्या घरी केले जाते. पण, गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा मात्र एकाच ठिकाणी केले जाते. आग्रोळी गावातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नवी मुंबईतील राजकीय तसेच इतर मंडळींची दहा दिवस गर्दी असते. दहा दिवस गावात उत्साहाचे वातावरण असते. विशेष म्हणजे कोरोना काळात देखील या उत्सवात कोणतीच खंडात पडली नव्हती, अगदी साधेपणाने गणपती उत्सव साजरा करण्यात आला होता.

आग्रोळी गांव नवी मुंबईतील एकमेव असे गाव आहे, जिथे ‘एक गांव एक गणपती'ची संकल्पना आजही जोपासली जाते. बाप्पाचे आगमन आणि विसर्जन सोहळा धार्मिक कार्यक्रमानेच साजरा केला जातो. दहा दिवस धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. -रोहिदास पाटील, अध्यक्ष-एक गांव एक गणपती मंडळ, आग्रोळी.

आजही कोणताही अवाढव्य खर्च न करता भवतीमय वातावरणात ‘एक गांव एक गणपती'चा गणेशोत्सवाचा सण आग्रोळी गावात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा होत आहे. दहा दिवसांचा पाहुणा गणराया, दरवर्षी गावातील पुरातन मंदिरात आणला जातो, स्थापिला जातो. गावातील बाळगोपाळ, युवक वरिष्ठ मंडळी मोठ्या हौशेने या गणरायाचे स्वागत करतात. गणेशोत्सव काळात प्रत्येक दिवशी ग्रामस्थांपैकी १२ ते १५ सदस्यांना २४ तास बाप्पाच्या सेवेची संधी दिली जाते. त्याप्रमाणे मनोभावे श्री गणेशाची दोन वेळची आरती या सदस्यांकडून तसेच ग्रामस्थांकडून केली जाते. -सुधीर पाटील, पदाधिकारी-एक गांव एक गणपती मंडळ, आग्रोळी.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘एसआरए'द्वारे झोपडपट्ट्यांचा विकास