वाशीतील नाल्यावरील गाळ्यांचा तिढा कायम
महापालिका या गाळ्यांचा तिढा सोडविणार की वारंवार गाळ्यांच्या दुरुस्तीवर उधळपट्टी करणार?
वाशी : वाशी, सेक्टर-१६ मधील नाला बंदिस्त करुन त्याजागी पे ॲन्ड पार्क आणि व्यावसायिक गाळे बांधण्यात आले आहेत. मात्र, सदर गाळ्यांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त होत नसल्याने मागील आठ-नऊ वर्षांपासून ते धूळ खात पडून आहेत. त्यामुळे या गाळ्यांचा तिढा कधी सुटणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नवी मुंबई महापालिकेने वाशी, सेक्टर-१६ येथील नाल्यावर ३० गाळ्यांचे बांधकाम केले आहे. मागील अनेक वर्षांपासून सदर गाळे कुणालाही वितरीत न केल्याने ते धूळखात पडलेले आहेत. सदर गाळे दिव्यांगांकरिता प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, नैसर्गिक नाल्यावर कुठल्याही प्रकारचे बांधकाम करता येत नसताना सदर गाळे बांधण्यात आले होते. त्यामुळे सदर गाळ्यांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त होत नाही. परिणामी, तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. रामस्वामी एन. यांनी सदर गाळे अनधिकृत असून याला परवानगी देता येणार नसलयाचे आदेश देत गाळे वितरीत करण्याचा प्रस्ताव रद्द केला होता.
तर दोन वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पुन्हा गाळ्यांचे रंगकाम करुन त्यांना नवीन शटर लावण्यात आले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आता पुन्हा गाळ्यांची दुरवस्था झाली असून गाळ्यांचे शटर पूर्णपणे गंजलेले असून काही शटर निखळले आहेत. अनधिकृत असलेल्या आणि वापराविना सदर गाळे आजही धूळखात पडून आहेत. तर या गाळ्यांबाबत मालमत्ता आणि नगररचना विभागाने एकमेकांकडे बोट दाखवत हातवर केले आहेत. त्यामुळे महापालिका या गाळ्यांचा तिढा कधी सोडविणार की वारंवार गाळ्यांच्या दुरुस्तीवर उधळपट्टी करणार?असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.