२४ लाखांच्या खर्चावर जमली शेवाळ
जुहुगावातील तलावात शेवाळ साचल्याने दुर्गंधी
वाशी : वाशी, सेवटर-११ जुहुगांव येथील तलावाची नुकतीच साफसफाई आणि सुधारणा करण्यात आली होती. यासाठी महापालिकेने २४ लाख रुपये खर्च केले होते. मात्र, इतका खर्च करुन देखील या तलावात शेवाळ साचल्याने येथील पाण्याला दुर्गंधी येत आहे. विशेष म्हणजे अशा पाण्यातच बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करावे लागणार असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात २३ नैसर्गिक तलाव होते. तलाव व्हिजन अंतर्गत महापालिकेने या तलावांचा कायापालट केला आहे. तर कोपरखैरणे, सेक्टर-१९ मधील तलावात शेवाळ आणि घाण पसरत असल्याने तो तलाव बुजवण्यात आला असून सद्यस्थितीत २२ तलाव असून यात श्री मूर्ती विसर्जित केल्या जातात. मात्र, जुहुगावातील तलावात श्री मूर्ती विसर्जित कशा करायच्या? असा प्रश्ना ग्रामस्थांना पडला आहे. या तलावात सध्या हिरव्या शेवाळीचे साम्राज्य पसरले असून येथील पाण्याला दुर्गंधी येत आहे.
या तलावात गावातील मलनिःस्सारण वाहिन्यांच्या गळतीचे पाणी येत असल्याचा संशय येथील ग्रामस्थांना आहे. मागील दोन वर्षांपूर्वी देखील हीच अवस्था होती. मात्र, नुकतेच महापालिका मार्फत या तलावाची सुधारणा आणि गाळ काढण्याचे काम करण्यात आले आहे. त्यासाठी २४ लाख खर्च करण्यात आला आहे. मात्र, इतका खर्च करुन देखील तलावात शेवाळ साचल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नुकतेच जुहूगाव मधील तलावातील गाळ काढून सुधारणा करण्याचे काम करण्यात आले होते. मात्र, तलावातील सद्यपरिस्थिती पाहता सदरचे काम कागदावर केले गेले आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. -हिमांशू पाटील, अध्यक्ष-जुहूगांव ग्रामस्थ मंडळ.
तलावाची सुधारणा आणि गाळ काढण्याचे काम करण्यात आले आहे. तरी देखील या तलावात मलनिःस्सारण वाहिन्यांच्या गळतीचे पाणी येत असल्याचा संशय येथील ग्रामस्थांना असेल तर या तलावाची तपासणी करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच तलावातील शेवाळ तात्काळ साफ करण्याच्या सूचना सफाई ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत.
-किरण पाटील, उपअभियंता, वाशी विभाग, नवी मुंबई महापालिका.