चिरनेर येथे हुतात्मा स्मृती दिन सोहळ्याचे आयोजन
२५ सप्टेंबर रोजी ८ शूरवीर हुतात्म्यांना सरकारी इतमामात मानवंदना
उरण : चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचा ९३ वा हुतात्मा स्मृतिदिन चिरनेर गांव येथे २५ सप्टेंबर रोजी सरकारी इतमामात साजरा होणार आहे. यावेळी नवी मुंबई उरण पोलिसांद्वारे बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली जाणार आहे. तसेच हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांना अभिवादन करण्यासाठी उरण सह रायगड, नवी मुंबई परिसरातील हजारो आदिवासी बांधव उपस्थित राहणार आहेत.
इतिहासाच्या सोनेरी पानावर ठळक नोंद असणाऱ्या चिरनेर जंगल सत्याग्रहाला २५ सप्टेंबर २०२३ रोजी ९३ वर्षे पूर्ण होत आहेत. ब्रिटीशांच्या विरोधात महात्मा गांधींनी उभारलेल्या सविनय कायदेभंग चळवळीचा एक भाग म्हणून सन १९३०मध्ये चिरनेर जंगल सत्याग्रह करण्यात आला. मात्र, त्यावेळी या सत्याग्रहींवर इंग्रज सैनिकांकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये धाकू गवत्या फोफेरकर (चिरनेर), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), रामा बामा कोळी (मोठी जुई), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे), नाग्या महादू कातकरी (चिरनेर), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसुराम बुधाजी घरत (खोपटे) असे आठ सत्याग्रही हुतात्मा झाले. या आठ शूरवीर हुतात्म्यांना दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी मानवंदना देण्यात येते.
यावर्षी चिरनेर ग्रामपंचायत, उरण पंचायत समिती, रायगड जिल्हा परिषद, उरण पोलीस ठाणे, पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने चिरनेर गावातील हुतात्मा स्मृती स्तंभाजवळ २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मान्यवरांच्या हस्ते हुतात्म्यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
3 Attachments • Scanned by Gmail