पनवेल महानगरपालिका क्षेत्रात भावपूर्ण वातावरणात नियोजनबध्दरित्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन
महापालिकेने चारही प्रभागामध्ये एकुण 59 ठिकाणी नैसर्गिक विसर्जनाची सोय
पनेवल : महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कोमोठे, पनवेल, खारघर या चारही प्रभागात एकुण ८ हजार घरगुती गणपतींचे भावपूर्ण वातावरणात नियोजनबध्दरित्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
माझी वसुंधरा ४.0 अंतर्गत स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त पनवेलसाठी पनवेल महानगरपालिका विविध उपक्रम राबवित आहे. या अंतर्गतच सणाचं पावित्र्य आणि पर्यावरणाचं भान राखलं जावं यासाठी आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा’ ही मोहिम हाती घेतली आहे. यासाठी महापालिकेने विशेष जय्यत तयारी केली आहे. याकामी विविध एनजीओ, विविध शाळांचे एनसीसी, एनएसएस चे विद्यार्थी महापालिकेला सहकार्य करत आहेत.
गणेशभक्तांच्या सोयी - सुविधांसाठी पालिकेच्या बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, विद्युत विभाग, परवाना विभाग, भांडार विभाग, वाहन विभाग व वैद्यकीय विभाग,पर्यावरणविभाग या 8 विभागांच्या माध्यमातून समन्वय साधून विसर्जन घाटांवरती संपूर्ण तयारी करण्यात आली होती.
यावर्षी महापालिकेने चारही प्रभागामध्ये एकुण 59 ठिकाणी नैसर्गिक विसर्जनाची सोय केली आहे. यामध्ये पनवेलमध्ये 9 ठिकाणी ,खारघर मध्ये 37 ठिकाणी, कळंबोली प्रभागामध्ये 9 ठिकाणी ,कामोठेमध्ये 4 ठिकाणी भक्तांना गणेश विसर्जनाची नैसर्गिक विसर्जनाची सोय करण्यात आली होती.
यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती महापालिकेच्यावतीने प्रभाग समिती अ मध्ये 15 ठिकाणी, प्रभाग समिती ब मध्ये 5 ठिकाणी, प्रभाग क मध्ये 5 प्रभाग समिती ड मध्ये 2 ठिकाणी अशी 27 ठिकाणी कृत्रिम तलावाची सोय नागरिकांना करून देण्यात आली होती.
याचबरोबर महापालिका कार्यक्षेत्रातील 69 मोठ्या चौकांमध्ये मुर्तीदान व्यवस्था करण्यासाठी मोठा मंडप उभारून कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच 300 पेक्षा जास्त फ्लॅट असणाऱ्या 19 सोसायट्यामध्ये तळमजल्यावरती मुर्तीदानासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. याचबरोबर नैसर्गिक तलावांच्या ठिकाणी विद्युत व्यवस्था, मंडप, बॅरिगेटिंग, गणेश मूर्तीची नोंदणी, लाऊड स्पीकर, लाईफ जॅकेट, विशेष तराफा निर्माल्य कलशाची सोय पालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.
आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन घाटांवर महापालिकेच्यावतीने अग्निशमन दल, वाहतूक विभाग, विद्युत विभाग, बांधकाम विभाग, घनकचरा व आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, सफाई कर्मचारी, मुख्यालय कर्मचारी तसेच पोलिस विभागाच्यावतीने चोख बंदोबस्त करण्यात आला होता.
यावर्षी पनवेल महापालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत असून यासाठी "बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा" अशी मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. याअंतर्गत मुर्तीदान संकल्पना महापालिकेने राबविली असून कृत्रिम तलावांची संख्याही दरवर्षीच्या तुलनेत वाढविली आहे. या मोहिमेचे हे पहिले वर्ष आहे. दीड दिवसांच्या गणेश विसर्जनामध्ये नागरिकांचा या मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. यामध्ये ७१४ हून अधिक गणेश मुर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. याबरोबरच ३० हून अधिक मुर्तींचे दान करण्यात आले. या "बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा" या मोहीमेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना महापालिकेच्यावतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.