ओएनजीसी तेल गळती बाधित शेतकरी, मच्छीमार १२ दिवसांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत
बाधित प्रकल्पग्रस्त, शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरुच
उरण : ८ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या ओएनजीसी उरण प्रकल्पातील तेल गळतीमुळे नुकसान झालेल्या मच्छीमार आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच इतर मागण्यांबाबत बाधित प्रकल्पग्रस्त आणि शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या साखळी उपोषणाची ओएनजीसी प्रशासनाने कोणतीच दखल घेतलेली नाही. घटना १२ दिवस उलटल्यानंतरही शेतकरी, मच्छीमारांना न्याय न मिळाल्याने संतप्त झालेले सामाजिक कार्यकर्ते वैभव कडू यांनी आक्रमक पवित्रा घेत आता आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
८ सप्टेंबर रोजी सकाळी ओएनजीसी प्रकल्प उरण येथून मोठ्या प्रमाणात तेल गळती झाली होती. सदर तेल गळतीमुळे नागांव, केगाव, दांडा, खारखंड आणि करंजा या गावाजवळील क्षेत्रात मच्छीमार आणि शेतकरी यांचे आर्थिक नुकसान झाले होते. सदर नुकसानीची आर्थिक मदत मिळणे आणि ओएनजीसी प्रकल्पामधून होणाऱ्या तेल गळती बाबत उपाययोजना करण्यासंदर्भात आढावा बैठक घेण्याची तसेच नुकसान भरपाईची मागणी नागाव, केगाव, दांडा, खारखंड आणि करंजा या गावातील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाकडे केली होती. त्यामुळे ओएनजीसी प्रकल्पामधून होणाऱ्या तसेच गळती, नुकसान भरपाई आणि विविध मुद्द्यांबाबत चर्चा आणिा उपाययोजना करण्याबाबत उरणचे तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी उध्दव कदम यांच्या अध्यक्षतेखाली १८ सप्टेंबर रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.
या बैठकीत प्रकल्पग्रस्त आणि शेतकऱ्यांनी आपली व्यथा, समस्या तहसीलदार उध्दव कदम यांच्याकडे मांडून नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी केली. त्यावर तहसीलदार उध्दव कदम यांनी आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ, असे सांगितले. मात्र, नुकसान भरपाई संदर्भात ठोस आश्वासन आणि कार्यवाही होत नसल्याने शेतकरी संतापले. त्यांनी सुरु केलेली साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते वैभव कडू यांनी ओएनजीसी तेल गळती बाधित शेतकरी, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही तर ओएनजीसी प्रशासनाविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.