अंनिस तर्फे वाशीमध्ये चमत्कार सत्यशोधन दिनानिमित्त संवादसत्र

‘चमत्कार सत्यशोधन दिनी' वाशी येथे संवादसत्र संपन्न

नवी मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सानपाडा शाखेतर्फे २१ सप्टेंबर रोजी ‘चमत्कार सत्यशोधन दिन' निमित्ताने संवादसत्र वाशी सेक्टर १ येथील स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यालयात पार पडले. २१ सप्टेंबर १९९५ रोजी ‘गणपती दूध प्याला' अशी माहिती संपूर्ण देशभर व जगभर पसरली होती. त्याचे उच्चाटन व प्रबोधन करून ही निव्वळ अफवा आहे हे नंतर सिद्ध झाले होते. त्या दिवसापासून महा. अंनिस. ‘२१ सप्टेंबर' हा दिवस ‘चमत्कार सत्यशोधन दिन' म्हणून साजरा करत असते.


 मुळात चमत्कार नसतातच. कोणत्याही कृतीमागे व घटनेमागे कारण असते. आपण त्याचा शोध घेतला तर ते आपल्याला कळू शकतं. आपण शोध घ्यायचा आळस करुन त्या गोष्टींना चमत्कारांचे लेबल लावून मोकळं होतो. असे लेबलींग करण म्हणजे अंधश्रद्धेकडे वाटचाल करणं. ही वाटचाल रोखायची तर ‘सत्यशोधन' केलं पाहिजे, असे मत संवादसत्रात मांडण्यात आले.  विचाररूपी पाण्यात अंधश्रद्धेचा कचरा आहे. सत्यशोधनाच्या तुरटीने तो पाण्याच्या तळाला बसवून, विवेकाच्या गाळणीतून गाळून स्वच्छ विज्ञानवादी विचारांचा आपण स्विकार केला पाहिजे असे प्रतिपादन यावेळी विजय केदारे यांनी केले. माध्यमे समाजाची भूमिका बनवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु आताची काही माध्यमे चमत्कारांच्या अफवांना वारेमाप प्रसिद्धी देताना दिसतात. हे समाजाला धोकादायक असल्याचे स्पष्ट करुन विवेकी विचार हे सत्यशोधनाचे फलित आहे, आपण विवेकी विचारांचे वाटसरू आहोतच; आपल्या बरोबर इतरांनाही विवेकी विचारांचे वाटसरू बनवायचा संदेश संवादसत्रात देण्यात आला. या संवादसत्रात निशिगंधा कदम, शिल्पा मंजुळे, प्रणाली परब, विजय केदारे, गजानंद जाधव, रोहित कांबळे, साहिल सोनावले व अशोक निकम यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सोनपावलांनी घरो घरी गौराईचे आगमन