गणेशमूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनाला ठाणेकरांचा प्रतिसाद

ठाणे महापालिका क्षेत्रात दीड दिवसांच्या १३९५५ गणेश मूर्तींचे विसर्जन

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. यावर्षी महापालिका क्षेत्रात दीड दिवसांच्या १३,९५५ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी याही वर्षी चांगला प्रतिसाद दिला.

त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण २०२ गणेशमूर्तींचे तसेच ११ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
 महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी निळकंठ वुडस्‌, मुल्ला बाग येथील कृत्रिम तलावाची पाहणी केली. छोट्या टाक्यांची आणखी सुविधा देण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नागरिकांनी कृत्रिम तलावांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त बांगर यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार व्यक्त केले आहेत. तर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांनी मासुंदा तलाव येथील विसर्जन घाट आणि रायलादेवी तलाव येथील विसर्जन घाट येथील विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली. तसेच पालायदेवी विर्सजन घाटाला नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.

ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात दीड दिवस, पाच दिवस आणि सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेतंर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, निळकंठ वुड़्‌स टिकुजीनी वाडी-बाळकुम रेवाळे, खारेगाव आदि ठिकाणी एकूण १५ कृत्रिम तलावांची व्यवस्था महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे. तर पारसिक रेती बंदर अणि कोलशेत बंदर याबरोबरच मिठबंदर, कळवा, गायमुख अशा सात ठिकाणी विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावर गणेशमूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रात एकूण ४२ ठिकाणी विसर्जनासाठी विशेष टाकी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

१० टनाहुन अधिक निर्माल्य दान...
ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ गेली १२ वर्षे गणेशोत्सव काळातील निर्माल्य व्यवस्थापन करीत आहे. त्यात रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी तसेच प्रकल्प पुनर्निर्माणचे सदस्य मदत करतात. दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे १० टनाहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करुन त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. तसेच निर्माल्यातील अविघटनशिल घटकांचे वर्गीकरण करुन ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहेत. यावर्षी अविघटनशिल घटक प्लास्टीक, थर्मोकोल यांचे निर्माल्यातील प्रमाण लक्षणियरित्या कमी झाले आहे. आतापर्यंत केवळ ४ टक्के म्हणजे ४०० किलो अजैविक कचरा गोळा झाला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अंनिस तर्फे वाशीमध्ये चमत्कार सत्यशोधन दिनानिमित्त संवादसत्र