वाशी ते खारघर दरम्यानच्या वाहतूक कोंडीतून होणार सुटका
खारघर-तुर्भे टनेल रोडची ४ वर्षात उभारणी
नवी मुंबई : खारघर येथे निर्माण होत असलेल्या इंटरनॅशनल कॉरपोरेट पार्कला (आयसीपी) थेट जोडण्यासाठी ‘सिडको'च्या वतीने खारघर-तुर्भे टनेल रोडची (केटीएलआर) उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पावर आकस्मिक खर्चासह तब्बल ३१६६ कोटी ७८ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून सदर प्रकल्प येत्या चार वर्षात पूर्ण करण्याचे ‘सिडको'चे लक्ष्य आहे. खारघर-तुर्भे टनेल रोड प्रकल्पामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना वाशी ते खारघर दरम्यान पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेत किमान १५ मिनिटांची बचत होणार आहे. त्याशिवाय या दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची सुटका देखील होणार आहे.
सायन-पनवेल मार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. ठाणे, पनवेल, कल्याण, डोंबिवली, कल्याण आणि पुढे कळंबोली, जेएनपीटी, पुणे, कोकण, कर्नाटक, गोवा अशा भागात जाणारी वाहतूक याच मार्गाने होत असते. ज्या महामार्गावरुन ताशी ७० किमी. ने वाहने धावणे अपेक्षित आहे, त्या रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे ताशी ४० ते ५० च्या गतीने वाहने धावत आहेत. परिणामी, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी उद्भवत आहे. तुर्भे येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी तुर्भे ते खारघर हा नियोजित भुयारी मार्ग लवकरात-लवकर सुरु करण्याची मागणी आमदार गणेश नाईक यांनी शासन स्तरावर लावून धरली होती.
नगरविकास विभागाने सायन-पनवेल महामार्गावरील खारघर-तुर्भे टनेल रोड (केटीएलआर) उभारण्यासाठी २४ जानेवारी २०२३ रोजी ‘सिडको'ची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. सायन-पनवेल महामार्गावर वाशी ते खारघर दरम्यान सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी निर्माण करण्यात येणाऱ्या खारघर-तुर्भे टनेल रोडच्या (केटीएलआर) निर्मितीकरिता होणाऱ्या खर्चाला सिडको संचालक मंडळाने नुकतीच सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच केटीएलआर प्रकल्प उभारणीचे काम मे. रित्वीक-एव्हरास्कॉन (जेव्ही) या संयुक्त भागीदारीत असलेल्या निविदाधारकाला देण्यावर संचालक मंडळाने शिक्कामोर्तब केले आहे.
खारघर येथे निर्माण होत असलेल्या इंटरनॅशनल कॉरपोरेट पार्कला (आयसीपी) थेट जोडण्यासाठी सायन-पनवेल महामार्गावर तुर्भे येथून पारसिक हिलचा डोंगर पोखरुन सदर रस्ता टनेल आणि व्हाया-डक्टच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे. केटीएलआर रोडची एकूण लांबी ५.४९ कि.मी. असून या मार्गाच्या दोन्ही दिशेला ४-४ मार्गिका असणार आहेत. सदर मार्ग संपूर्णतः उन्नत असून या मार्गावर उभारण्यात येणाऱ्या व्हाया-डक्टची लांबी ३.४ कि.मी. आहे. तर पारसिक हिलचा डोंगर पोखरुन १.८ कि.मी. लांबीचा बोगदा (टनेल) या मार्गात उभारला जाणार आहे. सदर भुयारी मार्ग तयार झाल्यानंतर तुर्भे येथे वाहतूक कोंडी न होता सदर वाहतूक थेट खारघर येथे बाहेर पडेल. त्यामुळे सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
‘सिडको'च्या वतीने खारघर-तुर्भे टनेल रोडची (केटीएलआर) उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पावर आकस्मिक खर्चासह ३१६६ कोटी ७८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. सदर प्रकल्प येत्या चार वर्षात पूर्ण करण्यात येणार असून या प्रकल्पामुळे वाशी ते खारघर दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची सुटका होणार आहे. - अनिल डिग्गीकर, व्यवस्थापकीय संचालक - सिडको.