विसर्जनाकरिता महापालिकातर्फे चोख व्यवस्था

 नवी मुंबईत दीड दिवसांच्या ९८७१ श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन

नवी मुंबई : १९ सप्टेंबर रोजीच्या श्रीगणेश चतुर्थीपासून प्रारंभ झालेल्या श्रीगणेशोत्सवात दीड दिवस कालावधीतील श्रीगणेशमूर्तीचे २० सप्टेंबर रोजी विसर्जन भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील २२ नैसर्गिक विसर्जन स्थळे तसेच १४१ कृत्रिम विसर्जन स्थळे अशा १६१ विसर्जन स्थळांवर दीड दिवसाच्या ९८७१ श्रीगणेशमूर्तींना भावभक्तीपूर्ण निरोप देण्यात आला

सर्व विसर्जन स्थळांवर आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, महापालिकेने चोख व्यवस्था केली होती. विभाग कार्यालयांमार्फत आपापल्या क्षेत्रातील विसर्जन स्थळांवर श्रीमूर्ती विसर्जनासाठी स्वयंसेवक तत्पर होते. २२ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर ७२११ घरगुती तसेच २५ सार्वजनिक मंडळांच्या ७२३६ श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच १४१ कृत्रिम विसर्जन स्थळांवर २६२८ घरगुती तसेच ७ सार्वजनिक मंडळांच्या २६३५ श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. अशा प्रकारे ९८३९ घरगुती आणि ३२ सार्वजनिक मंडळांच्या एकूण ९८७१ श्रीमूर्तीचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विसर्जन स्थळांवर गर्दी होऊ नये तसेच नैसर्गिक जलस्त्रोत शुध्द रहावेत याकरिता कृत्रिम तलावांचा वापर करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. त्यासाठी महापालिका क्षेत्रात १४१ इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांना सोयाीच्या ठिकाणी विभागाविभागांमध्ये कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलेली होती. त्याला पर्यावरणशील दृष्टीकोन जपणाऱ्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. २६३५ श्रीगणेशमूर्तींचे भाविकांनी आपल्या घराजवळच्या कृत्रिम तलावात विसर्जन केले.

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे विसर्जन व्यवस्थेवर बारकाईने लक्ष होते. अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ यांनी विर्सजन स्थळांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची प्रत्यक्ष पहाणी केली. परिमंडळ 1 चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ श्रीराम पवार हे देखील संबधित विभाग अधिका-यांसह आपापल्या परिमंडळ क्षेत्रात भेटी देत होते.

प्रत्येक विसर्जनस्थळी ओल्या आणि सुक्या निर्माल्यासाठी स्वतंत्र कलश ठेवण्यात आलेले आहेत. दीड दिवसांच्या गणेशोत्सवामध्ये १० टन ९४५ किलो निर्माल्य संकलित झालेले आहे. सदर निर्माल्य स्वतंत्र वाहनांद्वारे प्रकल्पस्थळी नेण्यात आले असून त्याठिकाणी निर्माल्याचे पावित्र्य राखून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.
‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या मार्गदर्शनानुसार परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या नियंत्रणाखाली पोलीस यंत्रणाही कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने दक्षतेने कार्यरत होती. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१६ ऑक्टोंबर रोजी परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन