महा.अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या स्वयं-अध्ययन परीक्षेचे पारितोषिक वितरण

महा.अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या स्वयं-अध्ययन परीक्षेस विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद

नवी मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पांतर्गत रा. फ. नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात आलेल्या स्वयं-अध्ययन परीक्षेस विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद देऊन विज्ञानवाद व विवेकवादप्रति आपली बांधिलकी अधोरेखित केली. १६ सप्टेंबर रोजी विजेते आणि सहभागींना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील, उपप्राचार्या श्रीमती चौधरी, ‘आपलं नवे शहर'चे उपसंपादक राजेंद्र घरत, महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते रोहित कांबळे, पवन जमदाडे, गजानंद जाधव, उत्तम रोकडे, अशोक निकम उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना विवेकवादाची कास धरता यावी, त्यांच्यातील चौकसपणा वाढावा या हेतूने नवी मुंबईत महा.अंनिसच्या वतीने प्रथमच या प्रकारच्या परिक्षा घेतल्या गेल्याचे यावेळी अशोक निकम यांनी सांगितले आणि या परिक्षेसाठी रा.फ.नाईक विद्यालय-कनिष्ठ महाविद्यालयाने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. श्रध्दा व अंधश्रध्दा यांच्यातील सीमारेषा फारच पुसट असून एका ठिकाणी जिला श्रध्दा म्हटले जाते, दुसरीकडे तीच अंधश्रध्दा ठरु शकते असे नमूद करुन राजेंद्र घरत यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या सारासार बुध्दीचा अधिक वापर करुन योग्य ते निवडावे असे आवाहन करतानाच आता आणखी दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश होऊ देता कामा नये असे आपल्या भाषणातून सांगितले. प्रा. पाटील व श्रीमती चौधरी यांनी विद्यार्थी अशा परिक्षांमध्ये दाखवत असलेल्या रुचिबद्दल त्यांचे कौतुक केले. सदर परिक्षेत इयत्ता ८ वी ते १० वी गटासाठी १३७ विद्यार्थ्यांनी; तर इयत्ता ११ वी ते खुला गटासाठी ८६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातून पहिल्या तीन क्रमांकांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आणि सर्व परीक्षार्थींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी ते खारघर दरम्यानच्या वाहतूक कोंडीतून होणार सुटका