२६,१३३ नागरिकांची स्वच्छतेची डिजीटल शपथ

डिजीटल युगाला महापालिकेचा साजेसा अभिनव उपक्रम

नवी मुंबई : इंडियन स्वच्छता लीग २.० अंतर्गत नवी मुंबई महापालिकेने विविध उपक्रम राबविले असून यामध्ये व्यापक लोकसहभागावर भर दिला आहे. १७ सप्टेंबरला आठही विभागांमध्ये नऊ ठिकाणी सामुहिक स्वच्छता शपथ असा उपक्रम भव्यतम स्वरुपात राबविण्यात आला. ज्यामध्ये १ लक्ष १४ हजार हून अधिक विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी सहभागी होत नवी मुंबईच्या स्वच्छता विषयक जागरुकतेचे आणि  एकात्मतेचे विशाल दर्शन घडविले.

अशाच प्रकारे आजच्या डिजीटल युगाला साजेसा अभिनव उपक्रम नवी मुंबईचे आकर्षण केंद्र असलेल्या वंडर्स पार्क येथे राबविण्यात आला. या ठिकाणी एका दिवसात २६ हजार १३३ नागरिकांनी स्वच्छतेची डिजीटल शपथ घेत स्वच्छ शहराविषयी असलेली आपली बांधिलकी प्रदर्शित केली.

‘स्वच्छता ही सेवा' अभियानामध्ये ‘कचरामुक्त भारत' अशी संकल्पना नजरेसमोर ठेवून कचरामुक्त शहरांच्या उभारणीत प्रामुख्याने तरुणाईला सहभागी करुन घेत कचऱ्याविरोधात युवकांची लढाई या घोषवाक्यानुसार नव्या पिढीत स्वच्छतेचे महत्व रुजविले जात आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका युवक सहभागावर भर देत विविध उपक्रम राबवित आहे.

अशाच प्रकारे वंडर्स पार्क येथे अभिनव स्वरुपात ‘स्वच्छतेची डिजीटल शपथ' असा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांना या उपक्रमात सहभागी होणे सोयीचे व्हावे याकरिता वंडर्स पार्कमध्ये सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत ‘एक दिवसाकरिता विनामूल्य प्रवेश' जाहीर करण्यात आला होता. यावेळी डिजीटल शपथ घ्ोतल्यानंतर नागरिकांना पाण्याच्या कारंज्यावरील लेझर शो दाखविण्यात आला. हजारो नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसह सदर ठिकाणी भेट देऊन मुलाबाळांसह वंडर्स पार्कच्या सफरीचा आनंद घ्ोतला.
सदर ठिकाणी डिजीटल शपथ घेण्यासाठी १० डिजीटल उपकरणे ठेवण्यात आली होती. त्या उपकरणांवर असलेल्या हाताच्या पंजाच्या रेखाकृतीवर नागरिकांनी आपल्या हाताचा पंजा ठेवल्यानंतर समोरच्या एलईडी स्क्रिनवर शपथेचा मजकूर प्रदर्शित होत होता. त्यामध्ये -मी माझ्या घरात कचऱ्याचे वर्गीकरण करेन, एकल वापराच्या प्लास्टिकचा मी उपयोग करणार नाही, मी माझा परिसर आणि माझे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी संपूर्ण योगदान देईन, अशी शपथ घ्ोतल्यानंतर डिजीटल स्क्रिनवर धन्यवाद संदेश येऊन आपण नवी मुंबई इको नाईटस्‌ संघाचे अमुक अमुक क्रमांकाचे सदस्य आहात, अशी संख्या प्रदर्शित होत होती. अशा प्रकारे एका दिवसात २६ हजार १३३ नागरिकांनी डिजीटल शपथ घेऊन नवी मुंबई इको नाईटस्‌ संघात सदस्य म्हणून आपला सहभाग नोंदविला. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकेच्या भरती प्रक्रियेमध्ये 377 पदांसाठी एकुण 54 हजार 558 अर्ज