महापालिकेच्या भरती प्रक्रियेमध्ये 377 पदांसाठी एकुण 54 हजार 558 अर्ज

 आस्थापनेवर प्रथमच होणाऱ्या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद 

पनवेल : पनवेल महापालिकेच्यावतीने आयुक्त तथा प्रशासक  गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार दिनांक 13 जुलै रोजी एकुण 41 संवर्गातील गट'अ' ते गट 'ड' मधील ३७७ रिक्त पदांसाठी सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रियेसाठी जाहिरत प्रसिध्द करण्यात आली होती. भरतीची सर्व प्रक्रिया ही टीसीएस कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर आस्थापनेवर प्रथमच होणाऱ्या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला आहे. महापालिकेच्या भरती प्रक्रियेमध्ये 377 पदांसाठी एकुण  54 हजार 558 अर्ज अंतिमत: प्राप्त झाले आहेत.

 या भरती प्रक्रीयेमध्ये प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधि, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यानसेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखा परीक्षण सेवा इत्यादी विभागांतील एकुण 377 पदांकरिता ही भरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते.

दिनांक 15 सप्टेंबर ही भरती प्रक्रियेची अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया पुर्ण होताच परिक्षेची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांना त्याचे प्रवेश पत्र टीसीएस कंपनीमार्फत पाठवले जाईल.

महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पनवेल महानगरपालिका व टीसीएस यांनी निश्चित केलेल्या केद्रांवरती ही परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा पारदर्शी होण्याकरीता खबरदारीचे उपाय म्हणून प्रत्येक केंद्रावरती जामर बसविण्याची सोय पालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. जेणे करून उमेदवारांना मोबाईल, ब्लूटूथ ,डिजीटल वॉचेस इत्यादी साधनांचा वापर करून अनुचित प्रकार करता येणार नाही.

तसेच प्रत्येक केंद्रावरती सुरक्षितेच्या दृष्टीने पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रावरती महापालिकेचा एक नियंत्रण अधिकारी व एक सहाय्यक अधिकारी अशा दोन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेतून महापालिकेस प्रशिक्षित व उच्च शिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याची माहिती आस्थापना उपायुक्त कैलास गावडे यांनी दिली आहे.

पनवेल महानगरपालिकेची ३७७ पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. सदर भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणार असून,कृपया नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना किंवा प्रलोभनांना बळी पडू नये. भरती प्रक्रिये संदर्भात कोणत्याही अधिकाऱ्याने ,पदाधिका-याने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रलोभन दाखविल्यास याबाबत त्यांचे विरुद्ध पुराव्यासह नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार दाखल करावी . परीक्षेच्या बाबतीत कोणतीही शंका असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.- गणेश देशमुख, आयुक्त ,पनवेल महानगरपालिका

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा न करण्याचे टोरंट वीज कंपनीला ठाणे महापालिकेचे निर्देश