महापालिकेच्यावतीने सफाई मित्र सुरक्षा क्षमता विकास कार्यक्रम

स्वच्छ भारत अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु

पनवेल : केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे स्वच्छ भारत अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी  पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. केंद्र शासनाच्यावतीने दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत  स्वच्छता पंधरावडा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. या अंतर्गत  आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी ‘सफाई मित्र सुरक्षा क्षमता विकास’ कार्यक्रमाचे आयोजन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये करण्यात आले  होते. यावेळी डॉ. स्मिता सिंग यांनी कर्मचाऱ्यांना कामादरम्यान घ्यावयाची काळजी , आरोग्याची काळजी  याविषयी  मार्गदर्शन केले.

दोन सत्रात झालेल्या या कार्यक्रमास उपायुक्त सचिन पवार, स्वच्छता आणि घनकचरा विभागप्रमुख अनिल कोकरे, किरण जाधव, जयप्रकाश म्हात्रे, आरोग्य निरीक्षक, चारही प्रभागातील स्वच्छता निरीक्षक  सफाई कर्मचारी, मलनिस्सारण विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. स्मिता सिंग यांनी  सफाई  कर्मचाऱ्यांना भविष्यातील शरीराचे नुकसान टाळायचे असेल तर योग्य वेळी काळजी घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले. तसेच काम करताना हातमोजे, मास्क, बुट, कॅप असे सर्व सुरक्षा साहित्य वापरणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्यावरती अवलंबून असणाऱ्या कुटूंबियांना कल्याणाकारी योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच  0-16 वयोगटातील लहान मुलांचे लसीकरण, बाबासाहेब श्रम साफल्य् योजना अशा विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच या योजनांचे बॅनर्स कार्यक्रम स्थळी लावण्यात आले होते. तसेच यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना स्टीलच्या टिफन बॉक्सचे वाटप करण्यात आले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 १.१४ लाख विद्यार्थी, नागरिकांकडून स्वच्छतेची  शपथ