इंडियन स्वच्छता लीगमध्ये ठाण्यातील हजारो शाळकरी विद्यार्थी झाले सहभागी

ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी दिली स्वच्छतेची शपथ

ख्यातनाम अभिनेते भाऊ कदम आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांची उपस्थिती

ठाणे :  स्वच्छतेचा संदेश देणारे फलक, पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या प्रतिकृती, गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धा आणि स्वच्छतेची सगळ्यांनी घेतलेली शपथ असा अतिशय देखणा सोहळा रविवारी दादोजी कोंडदेव क्रीडांगण येथे हजारो विद्यार्थी, शिक्षक, सफाई कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या सोहळ्यात, विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के, अशोक वैती, मीनाक्षी शिंदे, माजी उप महापौर पल्लवी कदम, स्थायी समितीचे माजी सभापती राम रेपाळे, माजी गटनेते मनोहर डुंबरे,  ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, उमेश बिरारी, उमाकांत गायकवाड, अनघा कदम, शंकर पाटोळे, मीनल पालांडे, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थी सहभाग

ठाणे महापालिका क्षेत्रातील खाजगी शाळा, महापालिका शाळा येथील विद्यार्थी या सोहळ्यासाठी उपस्थित होते. शाळांनी संकल्पनात्मक रचना या विषयावरील स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यांच्या संकल्पना, प्रकल्प, सादरीकरण यांचे परीक्षकांनी परीक्षण केले.

ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी स्वच्छ्ता राखण्याचे महत्त्व थोडक्यात सांगितले. त्यानंतर, त्यांच्या उपस्थितीत, ठाणे महापालिका आणि ठाणे वैभव यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ' एक मिनिट ठाण्यासाठी ' या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला. दामले यांनी सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.

सफाई कर्मचाऱ्यांसाठी योजना

इंडियन स्वच्छता लीग हा स्वच्छतेचा महोत्सव आहे. त्यानिमित्ताने, ठाणे महापालिकेत सफाई काम करणाऱ्या कांता ठाकूर आणि अनिल ठाकूर या दाम्पत्याचा प्रातिनिधिक सन्मान आजच्या सोहळ्यात करण्यात आला. इंडियन स्वच्छता लीग 2.0 मधील ठाणे टायटन्स या ठाणेकर नागरिकांच्या संघाचे कर्णधार अभिनेते भाऊ कदम आणि या उपक्रमाच्या दूत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी ठाकूर दाम्पत्याचा सन्मान केला.या दाम्पत्याच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विविध लाभदायी योजनेचा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी, भाऊ कदम यांनी स्वच्छतेत ठाणे शहर देशात अव्वल यावे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तर, मधुराणी प्रभुलकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वच्छतेचा संदेश घरोघरी घेवून जाण्याचे आवाहन केले.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत हा उपक्रम होत आहे. स्वच्छतेसाठी त्यांनी धरलेला आग्रह आपल्या फायद्याचा आहे. त्यामुळे आजचा विद्यार्थ्यांचा या उपक्रमातील मोठा सहभाग पाहून आनंद झाला, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले.

तर, स्वच्छ वायू सर्वेक्षणात ठाण्याने देशभरात तिसरा क्रमांक पटकावला आहे. आता स्वच्छ सर्वेक्षणात सुद्धा ठाणे अग्रेसर राहील, अशी अपेक्षा आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली.

त्याचवेळी, मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शहर म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे. विद्यार्थी स्वच्छतेचे खरे दुत बनतील आणि हा संदेश घेवून घरी जातील, असे प्रतिपादन माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केले.

या सोहळ्यात, विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. त्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. डिमॉलिशन या समूहाने सादर केलेले शिवनाट्य, श्यामोली यांनी सांगितलेली टाकावू कचऱ्यातून टिकावू कलाकृतींची गोष्ट, स्टॅण्ड अप कॉमेडिअन पुष्कर बेंद्रे यांनी रंगवलेले विनोद आणि आफरिन बॅण्डने सादर केलेली गाणी या कार्यक्रमांचा सोहळ्यात समावेश होता. ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

पर्यावरण पूरक गणेश मूर्ती स्पर्धा

मुख्य सोहळा सुरू असतानाच क्रीडांगण परिसरात पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धा झाली. त्याला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. त्याआधी, रविवारी सकाळी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. तसेच, ठाणे महापालिका आणि आम्ही सायकल प्रेमी यांच्या वतीने सायकल रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते.

तसेच, शनिवारी, शहर स्वच्छ करू आणि ठाण्याचे नाव देशात चमकवू अशी प्रतिज्ञा करत शाळा आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवी संस्था, सफाई कर्मचारी अशा शेकडो ठाणेकरांनी इंडियन स्वच्छता लीग 2.0 या उपक्रमासाठी शनिवारी कोपरी ते कळवा परिसरातील कांदळवन आणि पारसिक हिल येथे श्रमदान केले.

कोपरी- मिठबंदर रोड येथील गणेश विसर्जन घाट आणि पारसिक टेकडी येथे शनिवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी स्वच्छतेचा संदेश देणारा फ्लॅश मॉब करण्यात आला.

या मोहिमेत शुक्रवारी सकाळी दादोजी कोंडदेव क्रीडांगण येथे बेंजो वादनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकेच्यावतीने सफाई मित्र सुरक्षा क्षमता विकास कार्यक्रम