‘स्वच्छता अभियान सायकल राईड'ला सायकल प्रेमींचा प्रतिसाद

‘सायकल राईड'द्वारे स्वच्छतेचा संदेश

ठाणे : स्वच्छतेची शपथ घेत ठाणे, मुंबई, पनवेल, मुरबाड, कल्याण, डोंबिवली येथील ३४० हुन अधिक सायकल प्रेमींनी ‘स्वच्छता अभियान सायकल राईड'मध्ये सहभाग नोंदवला. या ‘राईड'मध्ये ९ वर्षाच्या मुलांपासून ते ७५ वर्षापर्यंतचे सर्व सायकलप्रेमी सहभागी झाले होते. या राईड दरम्यान घेण्यात आलेल्या स्लोगन स्पर्धेत प्रथम क्रमांक युगा बाचम, द्वितीय क्रमांक श्री सोंडकर, तृतीय क्रमांक आर्यन नाटे तर विशेष पारितोषिक ललित गोलतकर यांनी पटकावला.

केंद्र सरकारच्या इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत ठाणे महापालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर रोजी सकाळी ५ आणि १० कि.मी. अंतराची स्वच्छता अभियान या विषयावर ठाणे महापालिका मुख्यालय येथून ‘सायकल राईड'चे आयोजन केले होते. यात लहान मुलांचे पालक देखील सहभागी झाले होते. यावेळी व्यासपीठावर उपायुक्त शंकर पाटोळे, ‘आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशन'चे सेक्रेटरी दीपेश दळवी, संस्कृत शिक्षक दीपक धोंडे, जोशी-बेडेकर महाविद्यालयचे ग्रंथपाल प्रा. नारायण बारसे, सुप्रसिध्द सायकलपटू प्रवीणकुमार कुलथे, प्रा. सुनील भुसारा, आदि उपस्थित होते.

‘आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशन'च्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी सायकल चळवळ सक्षमपणे राबवण्यासाठी स्वतंत्र मार्गिका असावी, असे प्रास्ताविकात सांगितले. उपायुक्त शंकर पाटोळे यांनी ‘इंडियन स्वच्छता लीग'ची माहिती देत ठाणे महापालिका रस्ते, गटारे, पावाटा, घनकचरा व्यवस्थापन यापलिकडे जाऊन फिटनेसकडेही लक्ष देत आहे. सायकल बद्दल जनजागृती वाढत असल्याचे प्रतिपादन केले.

मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी वखारिया, संस्थेच्या अध्यक्षा म्हात्रे, सेक्रेटरी दळवी, स्वच्छता विभागचे लक्ष्मण पुरी यांच्या हस्ते झेंडा दाखवून ‘राईड'ला सुरुवात झाली. प्रत्येक सहभागी सायकलप्रेमींना टी-शर्ट, मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले. अजय नाईक यांनी सुत्रसंचालन केले.

भारतीय नौदलाचे रिंकू सिंह सहकाऱ्यांसोबत या राईडमध्ये सहभागी झाले होते. यापूर्वी त्यांनी गेटवे ऑफ इंडिया ते इंडिया गेटपर्यंत सायकल राईड करुन ‘बेटी बचाव बेटी पढाव'चा संदेश दिला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाहतूकीतील बदलाची नोंद घेऊन वाहने चालविण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन