‘गणेशोत्सव'साठी नवी मुंबई पोलीस अलर्ट
नियमांचे काटेकोरपणे पालन करुन शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
नवी मुंबई : गणेशोत्सव-२०२३ निर्विघ्नंपणे आणि आनंदात साजरा व्हावा. तसेच गणेशोत्सव काळात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेशभक्तांनी देखील गणेशोत्सव साजरा करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करुन शांततेत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.
१९ ते २८ सप्टेंबर या कालावधीमध्ये श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सव निर्विघ्नंपणे आणि आनंदाने साजरा करता यावा, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी देखील जय्यत तयारी करुन गणेशोत्सव काळात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. यावर्षी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयच्या हद्दीत एकूण ८४२ सार्वजनिक आणि ९०३२० खाजगी गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.
यात दिड दिवसाचे ४९ सार्वजनिक तर २१४८४ गणपती आहेत. अडीच दिवसाचे ४ सार्वजनिक, १२९९ खाजगी, पाच दिवसांचे गौरी गणपती १९८ सार्वजनिक तर ३२६८१ खाजगी गणपती आहेत. सहा दिवसांचे २८ सार्वजनिक आणि ६६५८8 खाजगी गणपती, ७ दिवसांचे १४० सार्वजनिक आणि ७०३५5 खाजगी तर दहा दिवसांचे (अनंत चतुर्दशी) ४२१ सार्वजनिक तर २०६९४ खाजगी गणपतींची प्रतिष्ठापना होणार आहे. त्याशिवाय ११ दिवसांचे १ सार्वजनिक आणि ३१० खाजगी तसेच १४ दिवसांचे ३७ खाजगी, तर २१ दिवसांचे खाजगी १२६ गणपतींची प्रतिष्ठापना होणार आहे.
पोलीस आयुक्तालयात १६ विसर्जन घाटांवर विसर्जन...
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात परिमंडळ-१ मध्ये वाशी-जागृतेश्वर मंदिर तलाव, कोपरखैरणे खाडी तलाव, तुर्भे तलाव, नेरुळ-चिंचवली तलाव, करावे गांव तलाव, दारावे गांव तलाव, सीबीडी-आग्रोळी तलाव, ऐरोली नाका तलाव, रबाले-ऐरोली सेक्टर-२० खाडी तलाव, दिघा तलाव, तर परिमंडळ-२ मध्ये कळंबोली-रोडपाली तलाव, खारघर-स्पॅगेटी तलाव, पनवेल-वडघर खाडी पनवेल, उरण विमला तलाव अशा एकूण १६ ठिकाणावर गणेशमुर्तींचे विसर्जन होणार आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे वॉच...
समाजकंटकांवर आणि समाजविघातक व्यक्तींवर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व गणेशमुर्ती विसर्जन घाटावर पोलीस आणि संबंधित महापालिकेच्या वतीने सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याशिवाय गणेश विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी देखील विशेष कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
चोख पोलीस बंदोबस्त...
गणेशोत्सव काळात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी नवी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्यासाठी ६ पोलीस उपआयुक्त, १० सहाय्यक पोलीस आयुक्त, ६७ पोलीस निरीक्षक, २७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक-पोलीस उपनिरीक्षक तसेच ३१५० पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय स्ट्रायकिंग फोर्स-८ (१२० पोलीस कर्मचारी), क्युआरटी-१, आरसीपी-१, एसआरपीएफ-२ प्लाटून तसेच ३०० होमगार्ड तैनात ठेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गणेशोत्सव मंडळे, विसर्जन स्थळे, मिरवणुकीचे मार्ग यावर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी नवी मुंबई पोलिसांचे प्रशिक्षीत बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तैनात ठेवण्यात येणार आहे.
ध्वनीप्रदुषण विरोधी पथक...
उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदुषण नियंत्रण नियम २००० आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ संदर्भात दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यात ध्वनी प्रदुषण विरोधी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना ध्वनीमापक यंत्रे हाताळण्याबाबतचे प्रात्याक्षिक प्रशिक्षण देण्यात आले असून यासंदर्भात कारवाई करण्याच्या पध्दती (एसओपी) याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बैठका...
गणशोत्सव सुरळीत आणि शांततेत पार पडावा यासाठी पोलीस ठाणे स्तरावर गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या, डॉल्बी मालकांच्या बैठका घेऊन त्यांना प्रामुख्याने ध्वनी प्रदुषण रोखणे तसेच उत्सव शांततेत साजरा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय शांतता कमिटी, मोहल्ला कमिटीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. सार्वजनिक गणशोत्सव मंडळांना विविध विभागाच्या परवानग्या एक खिडकी योजना अंतर्गत घेता यावेत, यासाठी विविध पोलीस ठाण्यांकडून मंडळांना परवानगी देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
गणेशोत्सव-२०२३ निर्विघ्नंपणे आणि आनंदात साजरा व्हावा. तसेच गणेशोत्सव काळात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेश भक्तांनी देखील गणेशोत्सव साजरा करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करुन शांततेत गणेशोत्सव साजरा करावा. नागरिकांना काही संशयास्पद आढळून आल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. - प्रशांत मोहिते, पोलीस उपायुवत-विशेष शाखा, नवी मुंबई.