‘इंडियन स्वच्छता लीग' अंतर्गत स्वच्छ चित्रकला स्पर्धा
१.८३ लाख विद्यार्थी सहभागाची ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस्'मध्ये नोंद
नवी मुंबई : इंडियन स्वच्छता लीग २.० अंतर्गत नवी मुंबई महापालिकेचा ‘नवी मुंबई इको नाईटस् संघ आपले मागील वर्षीचे सर्वाधिक युवक सहभागाचे प्रथम क्रमांकाचे राष्ट्रीय मानांकन कायम राखण्यासाठी सज्ज झाला असून त्या अनुषंगाने १२ सप्टेंबर पासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या शालेय स्तरावरील स्वच्छ चित्रकला स्पर्धेमध्ये १५ सप्टेंबर रोजी महापालिका क्षेत्रातील महापालिका आणि खाजगी अशा ४३१ शाळांमधील १,८३,१४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी करुन सहभागी होत विक्रम नोंदविलेला आहे. या विक्रमाची नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस्' मध्ये घेण्यात आली असून १ लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागाचे विक्रमी प्रमाणपत्र ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस्'चे भारतातील परीक्षक आंतरराष्ट्रीय क्रीडापटू बी. बी. नायक यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना प्रदान केले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आणि विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, शिक्षण विभागाचे उपायुक्त दत्तात्रय घनवट आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते आठवी तसेच नववी ते दहावी अशा तीन गटांमध्ये सदर स्वच्छ चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये विद्याार्थ्यांनी मोठया संख्येने उत्साहाने सहभागी होत आपल्या मनातील स्वच्छता संकल्पनांना चित्ररुप दिले. यामधील सर्वोत्कृष्ट चित्रांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्वच्छ शहर अशी ओळख असणा-या नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी नेहमीच स्वच्छता विषयक जागरुकता दाखविलेली आहे. तसेच स्वच्छता विषयक उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला आहे. त्यामुळे आपल्या मनातील स्वच्छता संकल्पनांना आवडत्या चित्रकलेच्या माध्यमातून मूर्तरुप मिळण्याची संधी उपलब्ध झाल्यानंतर नवी मुंबईतील लाखो विद्यार्थ्यांनी
चित्रकला स्पर्धेत हिरीरीने सहभाग घेतला. या सहभागाची दखल बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस् या राष्ट्रीय विक्रम नोंदविणाऱ्या संस्थेलाही घ्यावी लागली.
नवी मुंबई महापालिकेला मिळालेल्या या आणखी एका विक्रमी सन्मानामध्ये महापालिका क्षेत्रातील विदयार्थ्यांचे तसेच त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षक आणि पालकांचे महत्वाचे योगदान आहे. त्यामुळे आयुवत राजेश नार्वेकर यांनी सदरचा विक्रमी बहुमान नवी मुंबईकर नागरिकांना समर्पित केला आहे.