नवी मुंबई शहरात आता लुकलुकणार सोलार पथदिवे
बेलापूर विभागातून सुरुवात; शासनाचा खर्च
वाशी : नवी मुंबई महापालिका तर्फे नवी मुंबई शहरात प्रथमच सोलार पथदिवे बसवण्यात येणार आहेत. बेलापूर विभागातून सोलार पथदिवे बसवण्याची सुरुवात करण्यात येत असून, त्यासाठी सव्वाचार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सोलार पथदिवे बसवण्याचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात बसवण्यात येणाऱ्या सोलार पथदिव्यांमुळे लाखो रुपये विजेची बचत होऊन महापालिकेच्या तिजोरीत भर पडणार आहे.
देशात विजेची वाढती मागणी आणि पुरवठा कमी यामुळे वीज पुरवठ्यावर ताण पडत आहे. यावर उपाय म्हणून सोलार विजेचा पर्याय समोर आला आहे. ग्रामीण भागात रस्त्यावर प्रकाश टाकण्यासाठी सौर उर्जेचा वापर दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. आता शहरी भागात देखील सोलार पथदिवे बसवण्यावर भर दिला जात आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात प्रथमतःच सोलार पथदिवे बसवण्याचा प्रयोग केला जात आहे. त्याची सुरुवात बेलापूर विभागातून केली जाणार आहे. बेलापूर प्रभाग क्रमांक-८८ ते ९२ आणि ९९ तसेच प्रभाग क्रमांक-१०१ ते १११ मध्ये सोलार पथदिवे बसविले जाणार आहेत यासाठी सव्वाचार कोटी खर्च अपेक्षित असून, या कामाची निविदा काढण्यात आली आहे. नवी मुंबई शहरात सोलार पथदिवे बसवण्याचा सर्व खर्च राज्य शासन करणार आहे. साधारण पाचशे पेक्षा अधिक सोलार पथदिवे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे सोलार पथदिवे लागल्याने नवी मुंबई महापालिकेचे लाखो रुपये वीज बिल वाचणार आहे.
नवी मुंबई शहरात प्रथमच सोलार पथदिवे बसवले जाणार आहेत. यासाठी राज्य शासन अर्थ सहाय्य करणार आहे. त्यामुळे सोलार पथदिवे लागताच वीज बिलापोटी लागणारे नवी मुंबई महापालिकेचे लाखो रुपये वाचणार आहेत. - सुनिल लाड, कार्यकारी अभियंता (विद्युत) - नवी मुंबई महापालिका.
सोलार पथदिव्यांची वैशिष्ट्ये
ऊर्जा बचत : सूर्यप्रकाशाचे विजेमध्ये रुपांतर करुन फोटोव्होल्टेइक सौर ऊर्जा प्राप्त होते आणि ती अक्षय आहे.
पर्यावरण संरक्षण : सोलार पथदिवे कोणतेही प्रदूषण, आवाज, रेडिएशन निर्माण करत नाहीत.
सुरक्षितता : विजेचा शॉक, आग आणि इतर अपघात कधीही होत नाहीत.
सोयीस्कर : सोलार पथदिवे सोप्या पध्दतीने स्थापित केले जाऊ शकतात. ज्यासाठी बांधकामासाठी कोणत्याही रेषा उभारण्याची किंवा खोदण्याची आवश्यकता नाही. वीज खंडित होण्याची किंवा वीज निर्बंधांची चिंता नसते.
चांगली सुरक्षा : (सौर) सोलारऊर्जा अतिशय सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे. यात एक बुध्दीमान नियंत्रक आहे, जो बॅटरीचा वर्तमान आणि व्होल्टेज संतुलित करु शकतो तसेच हुशारीने पॉवर ऑफ देखील करु शकतो.