महापालिका प्रशासनाने विमा सुरक्षा कवच देण्याची मागणी

यंदाही श्रीमूर्ती विसर्जन करणारे स्वयंसेवक ‘विमा सुरक्षा कवच विना'

वाशी : श्रीमूर्ती विसर्जन करण्यासाठी नवी मुंबई महापालिका दरवर्षी स्थानिक पट्ट्यातील पोहणाऱ्या तरुणांची तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर नेमणूक करते. पाण्यातील धोका पत्करुन स्वयंसेवक मुले श्रीमूर्ती विसर्जित करीत असतात. मात्र, या तरुणांना महापालिका मार्फत आजवर कुठलेच विमा सुरक्षा कवच दिले जात नसल्याने यंदा देखील विमा कवच विना या तरुणांना श्रीमूर्ती विसर्जन करण्याचे काम करावे लागणार आहे.

नवी मुंबई शहरात दिघा पासून बेलापूर पर्यंत महापालिकाच्या २२ तलावात दरवर्षी श्रीमूर्तींचे विसर्जन केले जाते. तसेच २०२० पासून यात कृत्रिम तलावांनी भर घातली आहे. त्यासाठी महापालिका तर्फे चोख व्यवस्था करण्यात येत असून, करोडो रुपये खर्च करण्यात येत आहेत. तलावात श्रीमूर्ती विसर्जन करण्यासाठी महापालिका द्वारे स्थानिक पट्टीतील पोहणाऱ्या ७०० पेक्षा अधिक स्वयंसेवकांची पाच दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर नेमणूक करण्यात येते. या दिवसांत नवी मुंबई शहरात ३० हजार पेक्षा जास्त घरगुती आणि जवळपास १५०० सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन केले जाते. मात्र, श्रीमूर्ती विसर्जन करतेवेळी जवळपास १४ ते १६ तास या स्वयंसेवक मुलांना पाण्यात राहावे लागते. तलावात मोठ-मोठ्या श्रीमूर्ती विसर्जन करण्यासाठी येत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. तसेच तासनतास पाण्यात राहावे लागत असल्याने स्वयंसेवक आजारी पडण्याचीही जास्त शक्यता असते. श्रीमूर्ती विसर्जित केल्यानंतर स्वयंसेवक तरुणांना अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी आणि ताप यासारख्या आजारांना समोरे जावे लागते. याचा नाहक खर्च नंतर या स्वयंसेवक तरुणांना स्वतःलाच करावा लागतो. मात्र, या स्वयंसेवकांचा कुठलाही विमा महापालिका द्वारे उतरविला जात नाही. त्यामुळे राज्य शासनाने गोविंदांना दिलेल्या ‘विमा कवच'च्या धर्तीवर श्रीमूर्ती विसर्जन करणाऱ्या स्वयंसेवकांना देखील नवी मुंबई महापालिका प्रशासनाने विमा सुरक्षा कवच द्यावे, अशी मागणी कोपरी गावातील श्रीमूर्ती विसर्जन स्वयंसेवक विलीन पाटील यांनी केली आहे.

श्रीमूर्ती विसर्जन करणाऱ्या स्वयंसेवकांना नवी मुंबई महापालिका मानधन देते. मात्र, त्यांचा विमा उतरवत नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. - श्रीराम पवार, उपायुक्त (परिमंडळ-२) - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका मुख्यालयात अभियंता दिन साजरा