‘सिडको'मध्ये अभियंता दिन साजरा
राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये अभियंत्यांचे हवे बहुमोल योगदान - अनिल डिग्गीकर
नवी मुंबई : ‘सिडको महामंडळ'चे मुख्यालय असलेल्या सिडको भवन येथे १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘सिडको इंजिनिअर्स असोसिएशन'तर्फे अभियंता दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैया यांच्या जयंती निमित्त देशभर अभियंता दिन साजरा करण्यात येतो. सर एम. विश्वेश्वरैया यांनी अनेक समाजोपयोगी प्रकल्पांकरिता दिलेल्या योगदानामुळे १५ सप्टेंबर रोजी त्यांचा जन्मदिन देशभर अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
सिडको भवन येथील कार्यक्रमास ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, शांतनु गोयल, डॉ. कैलास शिंदे, मुख्य अभियंता (नवी मुंबई, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) आर. बी. धायटकर, , महाव्यवस्थापक (परिवहन, विमानतळ) गीता पिल्लई, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) करुणाकरन, ‘सिडको इंजिनिअर्स असोसिएशन'चे अध्यक्ष सुरेश ठाकूर, उपाध्यक्ष मनोज वाळिंबे, सरचिटणीस संजय नरसापूर, यांच्यासह ‘सिडको'तील विभाग प्रमुख, अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एम. विश्वेश्वरैय्या यांची अभियांत्रिकी क्षेत्रातील उज्ज्वल कामगिरी आणि त्यांनी जीवनामध्ये जपलेली मुल्ये यांचा आदर्श अभियंत्यांनी ठेवल्यास ते राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये बहुमोल योगदान देऊ शकतात, असे प्रतिपादन व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी केले. ‘सिडको'च्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांमुळे नवी मुंबईला जे वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे, त्यामध्ये ‘सिडको'तील आजी-माजी अभियंत्यांचे मोलाचे योगदान असल्याचेही डिग्गीकर यांनी यावेळी नमूद केले. तसेच आपली कार्यक्षमता आणि निर्मितीक्षमता वृध्दींगत करण्याकरिता वेगाने बदलणारे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा सल्लाही त्यांनी युवा अभियंत्यांना दिला.
सदर कार्यक्रमात अद्वितीय कामगिरी तसेच स्पर्धांमधील वैयक्तिक आणि सांघिक गटातील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अद्वितीय कामगिरी स्पर्धे अंतर्गत वैयक्तिक गटात सहाय्यक अभियंता समीर गोडबोले, गौरव हिंगणे, आणि परिवहन अभियंता यश हिवरकर यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. तर सांघिक गटात अधीक्षक अभियंता (पाणी पुरवठा), अधीक्षक अभियंता (विशेष प्रकल्प), अधीक्षक अभियंता (विमानतळ), अधीक्षक अभियंता (गृहनिर्माण-१, नवीन शहरे) आणि सिडको सामग्री चाचणी प्रयोगशाळा यांच्या संघांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
यानंतर वॉटरप्रुफिंग एक्सपर्ट ॲन्ड कोअर कमिटी मेंबर-एसीसीई रविराज शेट्टी यांनी ‘रेट्रोफिटिंग ॲन्ड वॉटरप्रुफिंग ऑफ स्ट्रक्चर्स' या विषयावर सादरीकरण केले.