नवी मुंबईत बाप्पांचे विसर्जन शांततेत होणार!

ईद ए मिलाद निमित्त २९ सप्टेंबरला जुलूस काढण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय  

नवी मुंबई : यावर्षी अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद असे दोन्ही सण एकाच दिवशी येत आहेत. त्यात गणेश विसर्जन मिरवणका आणि ईद ए मिलाद निमित्त काढण्यात येणारे जुलूस एकाच दिवशी असल्याने पोलिसांवर खूप मोठा ताण येणार आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलाद निमित्त काढण्यात येणारे जुलूस दुसऱ्या दिवशी काढावे, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडुन करण्यात आले आहे. या आवाहनाला नवी मुंबईतील मुस्लिम बांधवांनी प्रतिसाद देऊन गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी २९ सप्टेंबर रोजी आपले जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे पोलिसांकडून तसेच गणेश विसर्जन मंडळांकडुन स्वागत करण्यात येत आहे.  

यावर्षी गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद सण एकाच दिवशी आहेत. या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, दोन्ही सण शांतेत साजरे व्हावेत यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी १४ सप्टेंबर रोजि सकाळी वाशीतील साहित्य मंदिर सभागृहात गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि मुस्लिम बांधव यांच्यात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पोलीस उपायुक्त पानसरे यांनी ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन एकाच दिवशी येत असल्याने मुस्लिम समाजाने जुलूस २८ सप्टेंबर ऐवजी २९ सप्टेंबर रोजी काढावा, असे आवाहन केले. यावेळी मुस्लिम बांधवानी पोलीस उपायुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ईद ए मिलाद निमित्त आयोजित जुलूस दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा निर्णय त्यांनी सभागृहात जाहीर केला.

मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे पोलिसांसह गणेशोत्सव मंडाळांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत करुन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी परिमंडळ-१ मधील सहाय्यक पोलीस आयुक्त आणि सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.  

सण-उत्सवाच्या काळात लोक मोठ्या संख्येने जमतात. अशा परिस्थितीत काही समाजकंटक त्या गर्दीचा फायदा उचलत गैरप्रकार करुन सामाजिक सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न करत असतात. त्यामुळे या काळात कोणीही चुकीचे काम करताना दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, पोलीस तातडीने मदत करतील. येणारे सर्व सण शांततेत पार पडावेत यासाठी पोलीस विभागाकडून त्यांना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी सण-उत्सवाच्या काळात शांतता राखावी. - विवेक पानसरे, पोलीस उपायुवत - परिमंडळ - १, नवी मुंबई पोलीस आयुवतालय.

गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सण शांततेत साजरे व्हावेत यासाठी पोलिसांकडून  आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाचे आम्ही स्वागत करत असून त्यानुसार आम्ही अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी ईद ए मिलाद निमित्त जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात शहरात कुठल्याही प्रकारची अशांतता निर्माण होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी.  - आलम बाबा, अध्यक्ष - नवी मुंबई मुस्लिम एकता समाज.

परिमंडळ-२चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी देखील पनवेल मधील गणेशोत्सव मंडळांची आणि मुस्लिम बांधव यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत देखील तेथील मुस्लिम बांधावांनी गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ईद ए मिलाद निमित्त जुलूस काढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार ‘पनवेल'चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी मुस्लिम बांधवांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महापालिका ‘इंडियन स्वच्छता लीग २.०'चे उद्‌घाटन