प्रकल्पग्रस्त प्रतिनिधींची सिडको सोबत चर्चा

साडेबारा टक्के भूखंडासाठी प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन
 

उरण : ‘जेएनपीए'मधील प्रलंबित साडेबारा % भूखंड वाटपाच्या मुद्द्यावर संतप्त प्रकल्पग्रस्त नेत्यांनी १३ सप्टेंबर रोजी सिडको भवन येथे ठिय्या आंदोलन केले. कितीही वेळ लागला तरीही सिडको व्यवस्थापनासोबत बैठक करायचीच या उद्देशाने या नेत्यांनी सह-व्यवस्थापकीय संचालकांच्या केबिन बाहेर ठाण मांडली. अखेरीस ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे सायंकाळी सिडको भवन येथे दाखल झाल्यानंतर प्रकल्पग्रस्त नेत्यांसोबत त्यांची बैठक झाली. या बैठकीस ‘जेएनपीए'चे उपाध्यक्ष उन्मेश वाघ व्हिडीओ कॉन्फरन्सींग द्वारे तर चीफ मॅनेजर मनिषा जाधव आणि ‘सिडको'चे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रकल्पग्रस्त नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत ‘जेएनपीए' परिसरातील प्रलंबित साडेबारा %  भूखंड वाटपाबाबत चर्चा झाली. लवकरच साडेबारा टक्के भूखंडाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे जेएनपीए आणि सिडको अधिकाऱ्यांकडून यावेळी सांगण्यात आले. त्यावर नेतेमंडळी आक्रमक झाले. यानंतर बैठकीत बऱ्याच गोष्टींवर सकारात्मक चर्चा होवून कळीचा आणि अडचणीचा ठरणारा २७ ऐवजी २० या एकत्रीकारणामुळे प्रकल्पग्रस्तांना कौटुंबिक अडचणी येणार नाहीत याची दक्षता घेवू, असे सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे यांनी आश्वासन दिले.

जेएनपीटी साडेबारा % भूखंड वाटपाचे प्रकल्पग्रस्तांना ताबडतोब वाटप करणे याबाबतची समस्या गेल्या ४० वर्षापासून प्रलंबित आहे. याबाबत अनेक आंदोलने, मिटींग, मोर्चा, बैठका होवून सुध्दा अद्याप साडेबारा % चा प्रत्यक्ष ताबा प्रकल्पग्रस्ताना मिळालेला नाही. १८ जानेवारी २०२१ रोजी जेएनपीटी आण सिडको यांच्यामध्ये समझोता करार झाला आहे. सदर करारानुसार ३६ महिन्यांमध्ये सदर प्लॉटचा ताबा देणे बंधनकारक आहे. असे असताना आतापर्यंत गेल्या २७ महिन्यात काम संथपणे सुरु आहे. कामाची वर्कऑर्डर देण्याकरिता एक वर्ष वाया गेले आहे. या विलंबामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये मोठा असंतोष आहे. त्यामुळे या जमिनीचा ताबा ताबडतोब देण्यात यावा, अशी मागणी यावेळी बैठकीत करण्यात आली.


सदर बैठकीला ‘जेएनपीए'चे माजी विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील, ‘उरण सामाजिक संस्था'चे अध्यक्ष सुधाकर पाटील, जेष्ठ साहित्यिक एल. बी. पाटील, हेमलता पाटील, रमाकांत म्हात्रे, मधुसूदन म्हात्रे, भगवान पाटील, सुनील पाटील, डी. एस. म्हात्रे, संजय ठाकूर, जीवन कडू, रामचंद्र घरत, विलास म्हात्रे, आदि उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ठाणे मध्ये अमृत कलश यात्रेस प्रारंभ