डेंग्यू मलेरियाच्या डासांच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना बैठक

पनवेल :   पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात डेंग्यू आणि मलेरियाच्या डासाचे प्रमाण वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 14  सप्टेंबर रोजी मुख्यालयात उपायुक्त सचिन पवार यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकिय आरोग्य् विभाग आणि घनकचरा व स्वच्छता विभागाची बैठक घेण्यात आली.

यावेळी मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.आनंद गोसावी,  जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजाराम मोरे, घनकचरा व स्वच्छता विभाग प्रमुख अनिल कोकरे,  साथरोग अधिकारी डॉ.अक्षय ठासळे, चार प्रभागाचे प्रभाग अधिकारी, वैद्यकिय अधिकारी , स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

यावेळी उपायुक्त सचिन पवार यांनी डेंग्यू व मलेरिया होण्याची कारणे नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात करणे महत्वाचे सांगून , जनजागृतीचे बॅनर्स ,पोस्टर्स सर्व सोसायट्यापर्यंत पोहचविण्याच्या सूचना दिल्या.तसेच खाजगी दवाखान्यांनी त्यांच्याकडे मलेरिया डेंग्यूचे रूग्ण आल्यास महापालिका, जवळच्या प्रभागकार्यालयास किंवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास कळविण्याबाबत सूचना दिल्या. जेणेकरून महापालिकेस कोणत्या भागात आजार वाढतो हे कळेल व त्याठिकाणी उपाययोजना वाढविता येतील.

तसेच डॉ. आनंद गोसावी यांनी कर्मचाऱ्यांनी  डेंग्यू व मलेरिया होऊ नये यासाठीची माहिती सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी स्वत: पासून सुरूवात करावी. आपल्या जवळच्या , आसपासच्या सर्वांना आजाराची माहिती दिल्यास साथ वाढणार नाही. याचबरोबर स्वच्छता निरीक्षकांनी बांधकामांच्या ठिकाणी, सोसायट्यांमध्ये औषध फवारणी ,धुर फवारणीचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना दिल्या. तसेच स्वच्छता निरीक्षकांनी  आपल्या आपल्या भागाचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल वैद्यकिय आरोग्य विभागास देण्याच्या सूचना दिल्या. तसेच  डेंगी व मलेरियाचे डासाची उत्पत्ती स्थाने जसे घरातील कुंड्याखालील बश्या, फ्रिजचे डिफ्रास्ट ट्रे, कुलर, छतावर टाकलेले प्लास्टिक यामधील पाणी नियमित काढावे. घरातील फुलदाण्या, शोभिवत झाडांमधील पाणी नियमित बदलावे. ही माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवावी अशा सूचना दिल्या.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रकल्पग्रस्त प्रतिनिधींची सिडको सोबत चर्चा