‘इंडियन स्वच्छता लीग'साठी पनवेल महापालिका सज्ज

मुख्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियोजन बैठक

पनवेल  :‘इंडियन स्वच्छता लीग २.०' स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरामुक्त शहरे निर्माण करण्याच्या दिशेने तरुणांच्या नेतृत्वाखाली देशातील मोठ्या शहरांमध्ये केंद्र शासनातर्फे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये पनवेल महापालिका सहभागी होत असून आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे नियोजन करण्यासाठी उपायुक्त सचिन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीस अतिरिवत आयुक्त भारत राठोड, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त अभिषेक पराडकर, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, लेखा परीक्षक निलेश नलावडे, प्रभाग अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपायुक्त सचिन पवार यांनी इंडियन स्वच्छता लीग २.० अंतर्गत दिनांक १५ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या कार्यक्रामाची रुपरेषा सांगितली. १५ सप्टेंबर रोजी स्वच्छता पंधरावड्यांतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग २.०'चे उद्‌घाटन आणि सफाई मित्र सुरक्षा शिबीराचे आयोजन चारही प्रभागामध्ये करण्यात आले असून यामध्ये सुमारे १८०० सफाई कर्मचाऱ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तसेच पिल्लई कॉलेजमध्ये पलॅश मॉबचे आयोजन करण्यात येणार असल्याचे उपायुवत पवार यांनी सांगितले.
‘राष्ट्रव्यापी सेवा दिन'चे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी चारही प्रभागामध्ये ‘इंडियन स्वच्छता लीग २.०' रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यासाठी चारही प्रभागातील विविध शाळा, महाविद्यालये, एनसीसी विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. १८ सप्टेंबर रोजी ‘काम फाऊंडेशन'च्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘कपॅसिटी बिल्डींग'साठी प्रशिक्षणाचे आयोजन करणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.

सदर उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहावी आणि स्वच्छतेची लाट सर्वत्र पसरावी यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांनी ‘इंडियन स्वच्छता लीग २.०'रॅलीमध्ये तरुणांनी, विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच ‘इंडियन स्वच्छता लीग २.०' स्पर्धेमध्ये महापालिका मागील वर्षीपेक्षा अधिक उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डेंग्यू मलेरियाच्या डासांच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना बैठक