श्रीगणेशोत्सव निर्विघ्नंपणे पार पाडण्यासाठी महापालिका, पोलीस यंत्रणा सज्ज

सुनियोजित आयोजनासाठी आयुक्त राजेश नार्वेकर यांचे सर्व यंत्रणांना दक्षतेचे निर्देश

नवी मुंबई : श्रीगणेशोत्सव निर्विघ्नंपणे पार पाडण्यासाठी नवी मुंबई महापालिका आणि पोलीस यंत्रणा यांच्यासह सर्व प्राधिकरणे सज्ज झाली असून परस्पर समन्वय राखून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले.

‘श्री गणेशोत्सव-२०२३'च्या पार्श्वभूमीवर आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनविषयक बैठक महापालिका मुख्यालयात संपन्न झाली. यावेळी आयुक्तांनी प्रत्येक बाबीचा बारकाईने आढावा घेत तत्पर कार्यवाहीचे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, परिमंडळ-१चे उपायुक्त  सोमनाथ पोटरे, परिमंडळ-२चे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार तसेच परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे तसेच संबंधित विभागप्रमुख, सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंडपासाठी ऑनलाईन परवानगी अर्ज दाखल करणाऱ्या मंडळांचा आढावा घेताना अर्ज भरणा मुदतीच्या अखेरच्या दिवसापर्यंत दाखल झालेल्या २०५ अर्जांपैकी १३८ मंडळांना आत्तापर्यंत परवानगी देण्यात आलेली असून २६ अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत. तसेच ४१ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती घेतल्यानंतर आयुक्तांनी प्रलंबित अर्जांची परवानगी प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे कोणतेही मंडळ परवानगी मिळाली नाही म्हणून उत्सव साजरा करु शकले नाही असे होऊ नये, याची खातरजमा करण्याचे निर्देश विभाग अधिकाऱ्यांना दिले.

शासन आणि नवी मुंबई महापालिकेच्या वतीने यापूर्वीच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले असून त्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रात किती नागरिकांनी आणि मंडळांनी शाडुच्या मुर्तींची स्थापना केली, याचीही आकडेवारी संकलित करण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.

सर्व विभाग अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील विसर्जन स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करुन तेथे आवश्यक बाबींची पूर्तता करावी. श्रीमूर्तींचे आगमन आणि विसर्जन मार्ग यांची बारकाईने पाहणी करावी. त्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. यामध्ये विशेषत्वाने अंतर्गत रस्त्यांप्रमाणेच वाहतूक पोलीस विभागाच्या सुचनेनुसार ठाणे-बेलापूर मार्ग आणि सायन-पनवेल मार्गावरही त्वरित दुरुस्ती करावी. आवश्यक वृक्षछाटणी आणि रस्त्यांवरील दिवाबत्ती व्यवस्थेकडेही अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्यात यावे. सार्वजनिक मंडळांच्या आकाराने मोठ्या श्रीमूर्ती विसर्जित होतात, तसेच विसर्जनासाठी येणाऱ्या श्रीमूर्तींची संख्या जास्त असते. अशा विसर्जनाच्या ठिकाणी तरापयांच्या संख्येत वाढ करण्याचेही आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सूचित केले.

स्वच्छता आपली ओळख असून श्रीगणेशोत्सव काळात विसर्जन स्थळांप्रमाणेच शहरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात यावे. या कालावधीत फुले, पत्री, दुर्वा असे हरित निर्माल्य मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असल्याचे लक्षात घेत त्याच्या संकलनाची, वाहतुकीची आणि विल्हेवाटीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. विशेषत्वाने अनंत चतुर्दशीच्या अखेरच्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रीमूर्ती विसर्जनाचे मोठे प्रमाण लक्षात घेऊन त्याविषयीची खबरदारी घेऊन पूर्वतयारी करावी, असेही आयुक्तांनी सतर्क केले.
 
‘श्रीगणेशोत्सव-२०२३'च्या सुनियोजित आयोजनासाठी नवी मुंबई महापालिका आणि नवी मुंबई पोलीस दक्ष आहेत. भाविक भक्तजनांनीही श्रीगणेशोत्सव इकोफ्रेंडली पध्दतीने, सर्व नियमांचे पालन करुन निर्विघ्नंपणे संपन्न व्हावा याकरिता सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. - राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयात आजी -आजोबा दिन मोठ्या उत्साहात साजरा