ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी गणशोत्सव आरास स्पर्धा आयोजित
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळासाठी ठाणे महापालिका आयोजित गणेश आरास स्पर्धेस 18 सप्टेंबरपर्यत मुदतवाढ
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी गणशोत्सव आरास स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्या सार्वजनिक मंडळाना पहिले पारितोषिक रु. १०,०००/-, दुसरे पारितोषिक रु.७,५००/- व तिसरे पारितोषिक रु ६,५००/- अशी एकूण आठ बक्षिसे, स्मृतीचिन्हे आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. आरास स्पर्धेबरोबर 'उत्कृष्ट मुर्ती' आणि 'स्वच्छता' या साठी पारितोषिके देण्यात येतील असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.
या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अर्जाचे नमुने, माहिती व जनसंपर्क विभाग, महापालिका भवन, पहिला मजला, पाचपाखाडी, ठाणे (पश्चिम) येथे सकाळी 11.00 ते 1.30 व दुपारी 2.30 ते 5.00 या वेळेत मिळतील.अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2023 अशी असून ह्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही.
स्पर्धेसाठी नियम व अटी : ठाणे महापालिका क्षेत्रातील अनंत चतुर्दशीपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी मंडळे या आरास स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. संस्था/ मंडळ हे मा. धर्मादाय आयुक्त यांचेकडे नोंदणीकृत असले पाहिजे (अर्जासोबत प्रत जोडावी), मंडळाने/ संस्थेने गणेशोत्सव आयोजनात सजावटीत पर्यावरणपूरक गोष्टींचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे. परीक्षण करताना देखाव्याच्या कलात्मकतेसोबत देखाव्याचा उद्देशही विचारात घेतला जाईल. तसेच स्थानिक कलावंतांनी केलेल्या देखाव्यास प्राधान्य दिले जाईल. कोणत्या धर्माविषयी असहिष्णू वृत्ती प्रकट करणा-या देखाव्यांचा पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. निर्माल्य तसेच स्वच्छता याविषयी करण्यात आलेल्या गोष्टींचा विशेष बाबत म्हणून विचार केला जाईल. तसेच राज्यशासन, ठाणे महानगरपालिका, निवडणूक आयोग यांच्याकडून जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती, फलक, होर्डिंग तसेच संदेश प्रसारण करणे आवश्यक राहील., परीक्षणासाठी भेटीची वेळ संस्थेस आधी कळविण्यात येईल. परीक्षक परिक्षणासाठी फक्त एकदाच भेट देतील. त्यावेळी देखावा संपूर्ण तयार असणे आवश्यक आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल व तो सर्वांवर बंधनकारक राहील., देखाव्यासंबंधील ध्वनीफित असल्यास, ती ध्वनीफित फक्त 10 मिनिटे ऐकली जाईल. देखाव्याचा सरांश लेखी स्वरुपात असल्यास वाचन करुन निर्णय घेण्यात येईल तसेच सदर देखाव्याचे व्हीडीओ चित्रिकरण करुन ते पेनड्राईव्हमध्ये देणे बंधनकारक राहिल. जेणेकरुन परीक्षकांना निर्णय देतेवेळी पुन:श्च देखावा बघून गुण देणे सोयीस्कर होईल.
सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेमधील सहभागी मंडळांना निर्धारीत केलेल्या अटी व शर्ती लागू राहतील असेही महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले आहे. तरी जास्तीत जास्त शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.