उमेद आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्यात सामंजस्य करार

ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधीसह इंधन पुरविण्यासाठी घेणार उमेद पुढाकार - रुचेश जयवंशी

नवी मुंबई : ग्रामीण कुटुंबांतील बचत गटाच्या महिलांना रोजगाराच्या संधीसह स्वच्छ आणि सुरक्षित इंधन पुरवठा व्हावा. तसेच ‘उमेद'च्या समुदाय संसाधन व्यक्तींना अधिकचे उत्पन्न व्हावे या हेतुने उमेद आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्यातील सामंजस्य करार  करण्यात आला आहे. सदर सामंजस्य करार करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामीण भागातील कुटुंबांपर्यंत एलपीजी गॅसचा पुरवठा करण्याच्या संबंधाने रोजगाराच्या संधी, उपजीविका स्त्रोत निर्माण करणे, प्रधानमंत्री उज्वला योजना मधील ग्रामीण भागातील कुटुंबांना एलपीजी गॅस बाबत विविध सेवा पुरविणे, त्यांना स्वयंपाकाकरिता स्वच्छ आणि सुरक्षित इंधन पुरविणे, बंद पडलेल्या गॅस जोडणीचे पुनरुज्जीवन करणे, नवीन जोडणी देणे,
स्वच्छ-सुरक्षित इंधनाचे महत्व आणि गरज तळागाळापर्यंत पोहोचविणे, आदि बाबींचा समावेश यात आहे. या उद्देशाने हिंदुस्थान पेट्रोलियम महामंडळ आणि ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेद' यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

याप्रसंगी ‘उमेद अभियान'चे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, ‘एचपीसीएल'चे कार्यकारी संचालक अबुज कुमार जैन, मुख्य महाव्यवस्थापक (पश्चिम) व्ही. एस चक्रवर्ती, ‘उमेद अभियान'च्या उपसंचालक शीतल कदम तसेच दोन्ही कार्यालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यासाठी ‘उमेद अभियान'मधील कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती ची एचपी सखी म्हणून निवड करण्यात येणार आहे. पुरविण्यात येणाऱ्या सेवांसाठी एचपी सखी यांना ठराविक दराने सेवाशुल्क देण्यात येईल. सदरचा सामंजस्य करार ग्रामीण भागातील कुटुंबांना निरंतर स्वच्छ आणि सुरक्षित इंधनाचा पुरवठा होण्यास आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांना उत्पन्नाचे अतिरिक्त साधन निर्माण होऊन त्यांच्या उपजीविकेत वाढ होणार असल्याबाबत ‘उमेद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी समाधान व्यक्त केले. ‘उमेद'च्या समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून कार्यरत असणाऱ्या महिला उत्कृष्ट कार्य करतील, अशी खात्रीही जयवंशी यांनी यावेळी व्यक्त केली.

सुरुवातीस प्रायोगिक तत्वावर राज्यात जळगाव, कोल्हापूर, नागपूर, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यात सदर योजना राबविण्यात येणार आहे. या ५ जिल्ह्यातील प्रत्येकी ३ तालुक्यांची सदर पथदर्शी प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेली आहे. या प्रकल्पाचा आढावा घेऊन पुढे याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी गणशोत्सव आरास स्पर्धा आयोजित